लोकमत न्यूज नेटवर्क धुसाळा : धुसाळा हे गाव तलाठी सजा क्रमांक ४ मध्ये येत असून, या सजामध्ये नियुक्त तलाठी सध्या गायब आहेत. धुसाळा, घोरपड, बोन्द्री, नवेगाव व काटी येथील शेतकरी व विद्यार्थ्यांना तलाठी नसल्यामुळे अडचणी येत आहेत. या सजामध्ये तलाठी कार्यालय का नाही, असा प्रश्न गावकऱ्यांनी उपस्थित केलेला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून तलाठी गावात आलेच नाही किंवा मोबाइलही सुरू केला नाही. नुकत्याच आल्या पुरामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले. अनेक लोकांच्या घरात पाणी शिरले. पंचनाम्याला तलाठी जागेवर नसल्याने मोहाडी तालुक्यातील धुसाळा गावात लोकांना बराच त्रास सहन करावा लागत आहे. अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना तलाठी कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत. तलाठी ऑफिसमध्ये येत नसल्याने शेतकऱ्यांची कामे खोळंबलेली आहेत. म्हणून अखेर आज गावकऱ्यांच्या वतीने शासनाला जाग आणण्यासाठी तलाठी शोधून देणाऱ्यास ५ हजार रुपयांचे बक्षीसही जाहीर केले आहे. महसूल विभागाने तलाठीवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे.
धुसाळा येथील तलाठी मागील चार महिन्यांपासून कामावर रुजू नाहीत. त्यांनी येथील पदभार नवेगाव येथील तलाठ्यांकडे दिला आहे. तलाठी कार्यालयाचे काम म्हटले की, एकाच वेळेत काम पूर्ण होईल याची खात्री राहात नाही. गावात तलाठी नसल्याने ग्रामस्थांना विविध कागदपत्रांसाठी दहावेळा फेऱ्या माराव्या लागत आहेत. गावे दोन आणि तलाठी एक असल्यामुळे तलाठी कार्यालयात जाताच गर्दीचा मनस्ताप सहन करावा लागतो. परिणामी ग्रामस्थांचे बेहाल होत आहेत.
"मागील कित्येक दिवसांपासून आमच्या गावात तलाठी येत नाही. कायमस्वरूपी तलाठी देण्यासाठी प्रशासनाकडे अर्ज करूनही मागणीकडे अधिकाऱ्यांचे लक्ष नाही. सध्याच्या पदभार नवेगाव येथील तलाठी यांच्याकडे दिला असून, एकाच तलाठ्याकडे दहा गावे झाल्याने तलाठी कार्यालयामध्ये नेहमीच गर्दी असते. शेतकऱ्यांना बराच मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याने प्रशासनाला जागवण्यासाठी तलाठी शोधा आणि पाच हजार रुपये बक्षीस जिंका, असे आम्ही जाहीर केले आहे."- रोशन पुडके, सामाजिक कार्यकर्ता, धुसाळा