14 bhph16
एकोडी (भंडारा) : घरट्यातील पोपटाची पिले शोधण्यासाठी गेलेल्या आठ वर्षीय बालकाचा झाडावरून पडून मृत्यू झाल्याची घटना सकोली तालुक्यातील एकोडी येथे घडली. शुक्रवारी झाडावरून पडून जखमी झाल्यानंतर रविवारी पहाटे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. कृणाल शिसुपाल जांभूळकर (८) असे मृत बालकाचे नाव आहे. तो जिल्हा परिषद शाळेत ३ वर्गात शिकत होता. खोडकर स्वभावाचा कृणाल शाळा बंद असल्याने दिवसभर शेतशिवारात भटकत असे.
शुक्रवार १२ मार्च रोजी कृणाल काही मित्रांसोबत पोपटाची पिले शोघण्यासाठी रानात गेला होता. उंच झाडावर चढून घरट्यातून पोपटाची पिले काढण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी तो तोल जाऊन खाली कोसळला. परिसरातील शेतातील शेतकरी धावून आले. त्याला उपचारासाठी पळसगाव येथे नेण्यात आले; परंतु रविवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला. कृणालच्या वडिलांचा एक वर्षापूर्वी आकस्मिक मृत्यू झाला होता.