भंडारा : तुमसर तालुक्यातील हरदोली गावात रहस्यमय आगीने थैमान घातले असून गत ४० वर्षांपासून आगीचा प्रकार सुरू आहे. गुरुवारी शंकर बिसने यांच्या शेतातील धानाचे पुंजने जळाले आहे. यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हरदोली गावात रहस्यमय आगीचा अनुभव गावकरी घेत आहेत. या गावात घरांना आग लागणे, घरातील कपडे जळाल्याचे प्रकार घडले आहेत. घरावर दगड कोसळल्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत. याशिवाय लगत असणाऱ्या कर्कापूर गावांतही रहस्यमय आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. परंतु अद्याप कायमस्वरुपी उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत.
गावकऱ्यांनी रहस्यमय आगीच्या घटनेवर अंकुश घालण्याचे प्रयत्न केले आहेत. यात त्यांना यश आले नाही. अनेक वर्षांपासून गावकरी व शेतकरी नुकसान सोसत आहेत. नुकसानग्रस्त शेतकरी व घरमालकांना कधी शासन स्तरावरून भरीव आर्थिक मदत मिळाली नाही. यामुळे शासनाकडून गावकऱ्यांनी आर्थिक मदतीची अपेक्षा सोडली आहे. गावात फक्त नुकसान सोसल्याशिवाय गावकऱ्यांना गत्यंतर नाही. मात्र, गेली दोन वर्षे गाव व गावांच्या शिवारात आगीच्या घटना घडल्या नाहीत. यामुळे गावकरी बेफिकीर झाले होते व रहस्यमय आगीच्या दहशतीपासून दुरावले होते.
दोन वर्षांच्या कालावधीत घर व धानाच्या पुंजन्यांना आग लागली नसल्याने गावकरी बिनधास्त होते. परंतु गुरुवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास शेतकरी शंकर बिसने यांच्या शेत शिवारात असणाऱ्या धानाच्या पुंजन्याला त्यांच्या डोळ्यादेखत रहस्यमय आग लागली. आग विझविण्याची संधी त्यांना मिळाली नाही. पुंजन्याला अचानक आग लागल्याने धानाची राख झाली आहे. आग लागल्याची चर्चा गावांत पसरताच नागरिक व शेतकऱ्यांत भीती निर्माण झाली आहे. गावात घडणाऱ्या आगीच्या घटनांवर अंकुश घालण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे, अशी मागणी गावकरी करीत आहेत.
गत ४० वर्षांपासून गावांत रहस्यमय आगीच्या घटना घडल्या आहेत. मात्र, गेल्या २ वर्षात या घटना थांबल्या होत्या. परंतु, गुरुवारी दुपारी पुन्हा एका शेतकऱ्याचे धानाचे पुंजने जळाल्याने भीती निर्माण झाली आहे.
- नितीन गणवीर, सरपंच, हरदोली
या गावात आगीच्या घटनांत नुकसान झाल्याचा अनुभव गावकरी व शेतकऱ्यांना आहे. अनेक वर्षांपासून असे प्रकार सुरू असून नुकसानग्रस्तांना नैसर्गिक आपत्ती अंतर्गत आर्थिक मदत घोषित झाली पाहिजे. या दिशेने प्रयत्न करण्याची गरज आहे.
सतीश सोनेवाने, सामाजिक कार्यकर्ते, पांजरा