तुमसर येथील घटना : शैक्षणिक रेकार्ड जळून खाक, पालिकेचे अग्निशमन बंब नादुरूस्ततुमसर : येथील लोकमान्य टिळक राष्ट्रीय विद्यालयाला लागलेल्या आगीत शाळेचे संपूर्ण शैक्षणिक साहित्य जळून खाक झाले. ही घटना गुरूवारला दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली. आगीवर नियंत्रण मिळविण्यात पालिकेचा अग्निशमन बंबही निकामी ठरल्याने क्षणार्धात आगीचे तांडव सुरू झाले. स्वातंत्र्यपूर्व काळात सन १९२० मध्ये स्वराज्य प्राप्तीसाठी महात्मा गांधी यांच्या आदेशानुसार तुमसरात लोकमान्य टिळक राष्ट्रीय विद्यालय सुरू झाले. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे शाळा सकाळपाळीत सुरू आहे. त्यानंतर विद्यार्थी व शिक्षक घरी निघून गेल्यानंतर १२.३० च्या सुमारास प्राचार्यांच्या खोलीतून धूर निघताना परिसरातील लोकांना दिसून आले. काही लोकांनी शाळेजवळ जावून बघितले असता खोलीत आग लागल्याचे दिसले. त्यानंतर लोकांनीच शाळेचे शिक्षक, पोलीस व पालिकेच्या अग्निशमन विभागा कळविताच पोलीस आणि पालिकेचे अग्निशमन बंब आले. मात्र बंब नादुरूस्त असल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळविता आले नाही. दोन तासात सर्वकाही बेचिराख होत असताना पालिकेचे कर्मचारी बघ्याच्या भूमिकेत राहिले. या आगीत शाळेचे शैक्षणिक रेकार्ड, पेपर, टी.सी. मार्कशिट आदी भस्मसात झाल्याने याचा फटका आजी माजी विद्यार्थ्यांना बसणार आहे. (शहर प्रतिनिधी)पालिका प्रशासनाविरूद्ध संतापउन्हाळ्यात आगीचे प्रकार घडत असतात. अशावेळी पालिकेने अग्निशमन बंब अद्ययावत ठेवणे गरजेचे होते. मात्र याकडे दुर्लक्ष केल्यामुळे तुमसरचा ऐतिहासिक वारसा बेचिराख झाला. बंब अद्ययावत असता तर आगीवर नियंत्रण मिळविता आले असते.आगीच्या चौकशीची मागणीलोकमान्य टिळक राष्ट्रीय विद्यालयाच्या संस्था पदाधिकाऱ्यात वाद सुरू आहे. असे असताना शाळेला आग लागण्याचे नेमके कारण समोर न आल्याने शासकीय यंत्रणेमार्फत आगीची चौकशी करण्याची मागणी माजी आमदार अनिल बावनकर व शाळेचे विश्वस्त प्रमोद घरडे यांनी केली आहे.
राष्ट्रीय विद्यालयात आगीचे तांडव
By admin | Published: April 08, 2016 12:23 AM