१४ पैकी ७ ग्रामपंचायतींचा समावेश : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान पुरस्कार घोषित भंडारा : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात सन २०१६-१७ या वर्षात सहभागी झालेल्या ग्रामपंचायतींची जिल्हास्तरीय समितीने पाहणी केली. यात जिल्ह्यातील १४ ग्रामपंचायतींपैकी ७ ग्रामपंचायतींना पुरस्कार घोषित केले आहे. यात लाखनी तालुक्यातील शिवणी (मोगरा) व भंडारा पंचायत समितीमधील बेला ग्रामपंचायतींना संयुक्तरित्या प्रथम पुरस्कार घोषित करण्यात आले आहे. ही घोषणा शनिवारला जिल्हा परिषद प्रशासनाने केली. विजयी क्रमांक लाखनी तालुक्यातील रेंगेपार (कोहळी) ग्रामपंचायतीला तर द्वितीय पुरस्कार साकोली तालुक्यातील वडद ग्रामपंचायतीला मिळाला आहे. विशेष पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींमध्ये लाखांदूर तालुक्यातील पुयार, तुमसर तालुक्यातील राजापूर व मोहाडी तालुक्यातील पांढराबोडी यांचा समावेश आहे.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शरद अहिरे यांच्या मार्गदर्शनात उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) तथा समिती सचिव सुधाकर आडे यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची तपासणी मुल्यांकन करण्यात आले. २१ ते २४ मार्च दरम्यान ही तपासणी मुल्यांकन करण्यात आले. याचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी शरद अहिरे यांच्याकडे सोपविण्यात आला. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात जिल्ह्यातील १४ ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदविला होता. यात प्रत्येक तालुक्यातील दोन ग्रामपंचायतींचा समावेश होता. तालुकास्तरीय समितीने या ग्रामपंचायतीचे सर्वप्रथम पाहणी करून तसा अहवाल जिल्हास्तरीय समितीकडे सादर केला. त्या अहवालानंतर जिल्हास्तरीय तपासणी समितीने पंचायत समिती स्तरावरील ग्रामपंचायतींची तपासणी केली. यात सर्वदृष्टीने निकषास पात्र ठरलेल्या शिवणी, बेला, रेंगपार (कोहळी), वडद, पुयार, राजापूर व पांढराबोडी या ग्रामपंचायतीची पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतची घोषणा केली. या पुरस्काराचे वितरण जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने एका समारंभात वितरीत करण्यात येईल. (शहर प्रतिनिधी)लाखनी तालुक्याला दोन तर पवनीला शून्य संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान पुरस्कारासाठी जिल्हास्तरीय पहिला पुरस्कार संयुक्तरित्या देण्यात आला आहे. यात लाखनी तालुक्यातील शिवणी व भंडारा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या बेलाचा समावेश आहे. शिवणीसह द्वितीय पुरस्कारप्राप्त करणारी रेंगेपार (कोहळी) ही ग्रामपंचायत लाखनी तालुक्यातील दुसरी ग्रामपंचायत ठरली आहे. लाखनीला दोन, भंडारा, साकोली, लाखांदूर, तुमसर, मोहाडी या तालुक्यातील प्रत्येकी एका ग्रामपंचायतीची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे तर पवनी तालुक्यातील एकाही ग्रामपंचायतीला पुरस्कार प्राप्त करता आला नाही. विशेष पुरस्काराचे मानकरीसंत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात विशेष पुरस्काराचे प्रायोजन करण्यात आले होते. या पुरस्कारात कुटुंब कल्याण या विषयाकरिता स्व.आबासाहेब खेडकर पुरस्काराचे मानकरी ग्रामपंचायत पुयार (लाखांदूर) ठरली आहे. तर पाणी व्यवस्थापन या विषयाकरिता स्व.वसंतराव नाईक पुरस्कार ग्रामपंचायत राजापूर (तुमसर) ला प्राप्त झाला आहे. तसेच सामाजिक एकता विषयांकरिता डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार ग्रामपंचायत पांढराबोडी (मोहाडी) ला मिळाला आहे. ग्रामपंचायत ही ग्रामीण विकासाचा कणा आहे. ग्रामसेवक, ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य व ग्रामस्थांनी गाव विकासासाठी एकजुट साधली. यातूनच गावाचा विकास शक्य झाला आहे. हे विकासाचे सातत्य प्रत्येकानी टिकवून ठेवून गावाचे नाव उंचवावे.-शरद अहिरे, मुख्य कार्यकारी अधिकारी, भंडारा.ग्रामपंचायतीने सुंदर काम केलेले आहे. अभियानामुळे लोकांचे जीवनमान, शैक्षणिक दर्जा यात सुधारणा होण्यास मदत मिळते. नागरिकांनी घेतलेल्या पुढाकारातून गाव सर्वांगसुंदर बनले आहेत. यामुळे शासकीय योजनांमधूनही गावांचा विकास साधता येतो.- सुधाकर आडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, भंडारा.
शिवणी, बेला ग्रामपंचायतींना प्रथम पुरस्कार
By admin | Published: April 03, 2017 12:37 AM