चंदन मोटघरे
लाखनी : जैवविविधतेने नटलेल्या भंडारा जिल्ह्यात प्रथमच आढळली चौकोनी ठिपक्यांच्या नक्षीची पाल आढळली असून येथील ग्रीन फ्रेंड्स नेचर क्लबचा सर्परक्षक व सरपटणाऱ्या प्राण्यांवर संशोधन करणारा विवेक बावनकुळे याला ही पाल दिसली. या दुर्मीळ पालीला इंग्रजी नाव स्केअर स्पॉटेड गेक्को किंवा लिफ टोएड गेक्को असे आहे तर शास्त्रीय नाव हेमीडयाक्टीलस ग्रयासीलीस असे आहे. जिल्ह्यात प्रथमच हिचे अस्तित्व शास्त्रीयदृष्ट्या शोधून काढण्यात यश आले.
ग्रीन फ्रेंड्स नेचर क्लबचे कार्यवाह प्रा.अशोक गायधने म्हणाले, विवेक अनेक वर्षांपासून पक्षी, फुलपाखरे, साप यांचा अभ्यास करून त्यांचे निरीक्षण करतो. २० वर्षांपासून जिज्ञासा व उत्सुकतेपोटी सरपटणारे प्राणी साप, सरडे, पाली यांचा अभ्यास करायला लागला. त्याने ग्रीन फ्रेंड्स नेचरच्या अभ्यास चमूच्या माध्यमातून चौकोनी ठिपक्यांची नक्षी असलेल्या पालीचे (स्केअर स्पॉटेड गेक्को) अस्तित्व भंडारा जिल्ह्यात असल्याचे शोधून काढले आहे.
प्रा. अशोक गायधने यांच्या सहकार्याने सर्परक्षक पंकज भिवगडे, आरिफ बेग, सलाम बेग, नितीन पटले, हिमांशू चन्ने, लोकेश चन्ने, मयूर गायधने यांनी दीड वर्षांपासून पालीच्या शोधाबद्दल नियोजन केले. त्यांना वर्धाचे रेपटाइल्स एक्सपर्ट पराग दांडगे, पुणे येथील आशिष वलथरे यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे.
बॉक्स
अशी आहे दुर्मीळ पाल
दुर्मीळ पालीच्या अंगावर चौकोनी ठिपक्यांची नक्षी असून करड्या तपकिरी रंगाचे दोन लांब रांगा पाठीवर असतात. दुसरी चौकोनी ठिपक्यांची रांग पहिल्या रांगेपेक्षा रंगाने थोडी विरळ असते. आकाराने लहान आकाराची असलेली ही पाल विरळ जंगलात, झाडे झुडपे असलेल्या भागात आढळते. ग्रीन फ्रेंड्सच्या चमूने लाखनीजवळच्या विरळ जंगलात या पालीचा शोध घेतला. यापूर्वी विदर्भात चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ, वर्धा, अमरावती जिल्ह्यातील संशोधकांनी त्या-त्या भागात ह्या दुर्मीळ पालीचे अस्तित्व शोधून काढले होते.
250821\img-20210825-wa0046.jpg
photo