भंडारा : क्षुल्लक कारणावरून दाम्पत्य जीवनात खटके उडत असतात. त्यावरूनच काही वाद विकोपालाही जातात. अशावेळी सुखरूप सुरू असलेल्या संसारवेलीला वेगळेच वळण मिळत असते. मात्र, गोडी गुलाबीने अनेक दिवस सोबत घालवलेल्या दाम्पत्याला समुपदेशनाची फार मोठी गरज असते. कधी संभ्रमता, तर कधी कुणाच्या सांगण्यावरून आलेला मनातील दुरावाही दूर होत असतो. त्यामुळेच आता तुझं माझं जमेना, आता तुझ्यावाचून करमेना, अशी स्थिती समोर येत आहे.
कौटुंबिक वादाच्या प्रकरणात जिल्हा पोलीस मुख्यालयात असलेल्या भरोसा सेलच्या मार्फत अशाच जवळपास १९४ दाम्पत्यांमध्ये समेट घडवून आणण्यात यश आले आहे. या दाम्पत्याचे पुन्हा मनोमिलन झाले आहे. कोरोनाकाळात पती-पत्नीमध्ये होत असलेली चिडचिड, पैशांची आर्थिक चणचण, पत्नीवर किंवा पतीवर संशय, घरातील मंडळींशी नीट न बोलणे, मोबाईलचा अधिक वापर, आधुनिक राहणीमान या कारणावरून दाम्पत्यांमध्ये तक्रारी वाढत आहेत. अशा संबंधित तक्रारी भरोसा सेलकडे तक्रार प्राप्त होताच दोघांमध्ये समुपदेशन केले जात असते. संसार टिकवण्यासाठी पुढाकार घेत त्यांच्या कुटुंबांच्या मानसिकतेचा अभ्यासही केला जात असतो.
बॉक्स
भांडणाचे लहान-सहान प्रकार
पती-पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणे होताना दिसून येतात. याशिवाय संशयी वृत्तीने पाहणे, मोबाईलचा वापर, घरातील कामे न करणे, इतरांशी न बोलणे, वारंवार माहेरी जाणे, विनाकारण भांडण करणे, सतत खरेदी करणे आदी क्षुल्लक कारणांवरून दाम्पत्यामध्ये भांडणे होतात.
बॉक्स
भंडारा मुख्यालयात भरोसा सेल
जिल्हा पोलीस मुख्यालय परिसरात भरोसा सेलची निर्मिती करण्यात आली आहे. या सेलमार्फत पती-पत्नीमध्ये झालेला वाद सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जातो.
कोट बॉक्स
भरोसा सेलकडे घरगुती वादातून अनेक दाम्पत्य अर्ज करतात. त्यानंतर त्यांच्या कुटुंबांच्या मानसिकतेचा व दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेऊन भरोसा सेलकडून त्यांचे समुपदेशन केले जाते. लहान-सहान बाबींमुळे संसार मोडू नये, याची दक्षताही या प्रसंगी घेतली जाते. त्यामुळे भरोसा सेलला समेट घडवून आणण्यात यश मिळत आहे.
-वसंत जाधव, जिल्हा पोलीस अधीक्षक, भंडारा.