भंडारा : जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील मत्स्य व्यवसायासाठी दिलेल्या तलावांच्या लिजला एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली असून लिज रक्कमही माफ करण्यात आली आहे. याबाबत जिल्हा परिषदेने आदेश निर्गमित केला असून लिज माफ करण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी पाठपुरावा केला होता.
कोरोना संसर्गाचा फटका सर्वांनाच बसला आहे. मत्स्य व्यवसाय करणारे बांधवही मोठ्या अडचणीत आले आहेत. वर्षभरात कुठलीही कमाई झाली नाही. आता जिल्हा परिषदेच्या तलावांची लिज भरण्यासाठी पैसेही नाहीत. हा प्रकार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या लक्षात आला. त्यावरुन त्यांनी संबंधितांना सूचना दिल्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून यांनी सोमवारी एक आदेश निर्गमित केला. त्यात जिल्हा परिषदेंतर्गत येणाऱ्या मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना लिजवर दिलेल्या तलावांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत २५ मे रोजी सर्व अधिकाऱ्यांसोबत याबाबत चर्चा करण्यात आली. त्या अनुषंगाने ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे. कोरोना संसर्ग, अतिवृष्टी यामुळे मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांचे उत्पन्न कमी झाले आहे. आर्थिक संकटात असलेल्या या संस्थांना आता मोठा दिलासा मिळणार आहे.
बाॅक्स
तलावांचे खोलीकरण कधी?
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात माजी मालगुजारी तलाव आहेत. अनेक वर्षांपासून या तलावांच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. जिल्हा परिषद केवळ लिजवर तलाव देऊन आपली जबाबदारी झटकून टाकते. या तलावांची साठवण क्षमता कमी झाल्याने मत्स्यव्यवसाय करणे अडचणीचे होत आहे. आता जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील त्यांच्या अखत्यारीतील मामा तलावांचे खोलीकरण करावे, अशी मागणी होत आहे.