भंडारा : लॉकडाऊननंतर कोरोनाचे रुग्ण कमी होताच एसटीच्या गाड्या पुन्हा धावू लागल्या होत्या. मात्र, आता पुन्हा नव्याने कोरोना संसर्गात वाढ होत असल्याच्या भीतीने आता पुन्हा एकदा प्रवासी एसटीपासून दुरावत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे यापूर्वी धावणाऱ्या बसपेक्षा आता एसटीच्या फेऱ्याही कमी झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, असे असले तरी एसटी महामंडळाकडून विविध उपाययोजना आखून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
जिल्ह्यात दररोज ५६० चालक-वाहकांचा किमान ३५ ते ४० हजार प्रवाशांशी संपर्क येतो. कोरोनापूर्वी २३५० बसफेऱ्या भंडारा विभागात धावत होत्या. मात्र, आता दीडशे फेऱ्या कमी झाल्याने २२०० बस आता धावत आहेत. लॉकडाऊनपूर्वी तब्बल ६५ हजार प्रवासी संख्येवरून आता फक्त पस्तीस ते चाळीस हजार प्रवासी एसटीने प्रवास करत असल्याचे चित्र आहे. असे असले तरी आता काही ठिकाणी विनामास्क प्रवास करत असल्याचेही चित्र दिसत आहे. बसस्थानकात वारंवार प्रवाशांना सूचना दिल्या जातात.
बॉक्स
मास्क सॅनिटायझरचा खर्च एसटीचाच
चालक-वाहकांना मास्क, सॅनिटायझर एसटी महामंडळातर्फे दिले जाते. भंडारा नगर परिषद प्रशासनाने काही प्रमाणात मदत केली होती. मात्र, आता एसटी महामंडळच पूर्ण खर्च उचलत आहे. कोरोना काळात एसटीचे अनेक कर्मचारी पॉझिटिव्ह सापडले. मात्र, त्यांच्यासाठी शासनाने मदतनिधी दिला नसल्याची ओरड कर्मचारी करीत आहेत.
बॉक्स
३५७ कर्मचाऱ्यांच्या झाल्या कोरोना चाचण्या
लॉकडाऊननंतर बस सुरू झाल्याने ३५७ एसटी कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये काही कर्मचारी पॉझिटिव्ह सापडले. मात्र, त्यांच्यावर वेळीच उपचार केल्याने ते लवकरच बरे झाले.
बॉक्स
ऑनलाइन बुकिंग झाले कमी
भंडारा आगारातून नागपूर तसेच लांब पल्ल्याच्या गाड्यांना प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत होता. मात्र, आता पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्यामुळे मागील आठवडाभरापासून प्रवाशांची संख्या कमी-जास्त होत आहे. त्यामुळे ऑनलाइन बुकिंगला प्रतिसाद कमी झाल्याचे चित्र आहे.
बॉक्स
३५ हजार प्रवाशांचा रोज प्रवास
लॉकडाऊनपूर्वी तब्बल ६५ हजार प्रवासी संख्येवरून आता फक्त पस्तीस ते चाळीस हजार प्रवासी एसटीने प्रवास करत असल्याचे चित्र आहे. दररोज होणारी प्रवासीसंख्या लक्षात घेऊन एसटी महामंडळ व जिल्हा आरोग्य विभागाने भंडारा आगारात विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. मात्र, असे असले तरी आता काही ठिकाणी विनामास्क प्रवास करत असल्याचेही चित्र दिसत आहे. बसस्थानकात वारंवार प्रवाशांना सूचना दिल्या जातात. मात्र, प्रवासी तेवढ्यापुरतेच तोंडाला रुमाल बांधतात; पुन्हा अनेक जण विनामास्क प्रवास करत असल्याचे चित्र दिसून येते.
कोट
वरिष्ठांच्या सूचनेनुसार मास्क, सॅनिटायझर वापराचे निर्देश दिले आहेत. यासोबतच ३५७ कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट झाली आहे. प्रवाशांनाही वारंवार मास्क, सॅनिटायझर वापरण्याच्या सूचना बसस्थानकातून दिल्या जात आहेत. प्रवाशांनीही सहकार्य करण्याची गरज आहे.
फाल्गुन राखडे, भंडारा आगारप्रमुख.
कोट
एकदा लॉकडाऊनचा अनुभव घेतला आहे. त्यामुळे कर्तव्यावर जाण्यापूर्वीच सॅनिटायझर लावतो. मात्र, काही झाले तरी मनामध्ये भीतीही राहतेच ना!
एसटीचालक, भंडारा
कोट
वाहकाने कितीही टाळले तरी प्रत्यक्ष पैसे किंवा तिकीट देवाण-घेवाण करताना प्रवाशांशी संपर्क येतो. त्यामुळे मनात अनामिक भीती असतेच; तरीही स्वतः मास्क, सॅनिटायझरचा वापर करून कर्तव्य निभावत आहे.
एसटीवाहक, भंडारा.