लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शहराची जीवनदायी असलेली वैनगंगा अलीकडे सुसाईड पाॅइंट झाली असून दोन दिवसात वैनगंगेत पाच जणांनी उडी घेतली. दोघांना वाचविण्यात पोलिसांना यश आले. तर एकाचा मृत्यू झाला. दोघांचा शोध गुरुवारी सायंकाळपर्यंत सुरू होता. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. (Five people jumped in Wainganga; Two rescued, one dead and two missing)
भंडारा शहरालगत असलेल्या वैनगंगा नदीच्या लहान पुलावरून मंगळवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास एका तरुणाने उडी घेतली. याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली. मात्र रात्री अंधार असल्याने शोध घेता आला नाही. दरम्यान, बुधवारी सकाळपासूनच शोधमोहीम सुरू होती. वैनगंगा नदीच्या मोठ्या पुलाजवळ शोधमोहीम सुरू असताना ३० वयोगटातील दोन तरुणांनी वैनगंगेच्या लहान पुलावरून उडी घेतली. हा प्रकार बचाव पथकातील पोलिसांना दिसला. त्यांनी तत्काळ तिकडे बोट वळवून या दोघांना बाहेर काढले.
दरम्यान, बुधवारी रात्री पुन्हा एका तरुणाने वैनगंगेत उडी घेतली. तर गुरुवारी सकाळी एका तरुणाने मोठ्या पुलावरून उडी घेतली. शोधमोहीम सुरू असताना एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. राहुल वामन तायडे (३०) रा. पिंपळगाव, ता. लाखनी असे मृताचे नाव आहे. त्याने मंगळवारी रात्री उडी घेतली होती. मोटारसायकल पुलाजवळ ठेवल्याने हा प्रकार उघडकीस आला होता. नेमकी त्याने कोणत्या कारणाने आत्महत्या केली हे मात्र कळू शकले नाही. भंडारा पोलीस अधिक तपास करीत आहेत.
किराणा व्यावसायिक व लाँड्रीचालक बचावले
येथील सहकारनगरातील ३० वर्षीय किराणा व्यावसायिक आणि तकिया वाॅर्डातील हनुमान नगरातील लाँड्रीचालकाने बुधवारी सायंकाळी ५.१५ वाजता वैनगंगेच्या लहान पुलावरून आत्महत्या करण्यासाठी उडी मारली. त्याच वेळी एका बेपत्ता तरुणाची शोधमोहीम सुरू होती. बोटीत असलेले भंडारा ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मंगेश नागरगोजे, पोलीस नायक नागोसे आणि जिल्हा शोध व बचाव पथकातील सदस्य सीताराम कोल्हे, अमरसिंह रंगारी, अशोक देवगडे यांना हा प्रकार दिसला. त्यांनी तत्काळ तरुणांनी उडी टाकलेल्या ठिकाणी बोट वळविली. या दोघांनाही महत्प्रयत्नांनंतर सुखरूप बाहेर काढले. या दोघांनी नेमकी कोणत्या कारणाने वैनगंगेत उडी घेतली होती हे मात्र कळू शकले नाही. भंडारा शहरचे ठाणेदार प्रदीप पुल्लरवार यांनी या दोघा तरुणांना समज देऊन घरी रवाना केले. दरम्यान, बेपत्ता असलेल्या दोन तरुणांचा सायंकाळपर्यंत शोध सुरू होता. त्यांची नावेही कळू शकली नाही.