भंडारा : महापुरात आई-वडील गमावल्यानंतर जगण्याचा संघर्ष सुरू असलेल्या पाच भावंडांना हक्काच्या पैशासाठी प्रशासनाचे उंबरठे झिजवावे लागत होते. याबाबत मंगळवारी ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले आणि प्रशासन खडबडून जागे झाले. बुधवारी या भावंडांना लाखनीच्या बँक ऑफ इंडियातून २३ हजार रुपयांचा विड्राॅल देण्यात आला. संवेदनशील जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेतल्याने अवघ्या २४ तासात सूत्रे हलली. एवढेच नाही तर या मुलांच्या भविष्यासाठी व शिक्षणासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला आहे.
वैनगंगा नदीच्या महापुरात रूपचंद कांबळे आणि त्यांची पत्नी रत्नमाला यांचा बुडून मृत्यू झाला होता. या दोघांच्या मृत्यूने दुर्गा, सोनू, मोनल, अमित आणि संयोगी ही पाच बालके निराधार झाली. लाखनी तालुक्यातील सिपेवाडा येथे आश्रयाला गेली. दरम्यान प्रशासनाकडून ८ लाख रुपये मदत मिळाली. ही सर्व मदत लाखनीच्या बँक ऑफ इंडियात दीर्घ मुदतीत ठेवण्यात आली होती. मात्र त्यावरील व्याज काढण्याची परवानगी या भावंडांना होती. मात्र त्यासाठी भंडारा तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांची स्वाक्षरी आवश्यक होती. कोरोना संकटात जगण्यासाठी दुर्गा कांबळे ही विड्राॅल स्लिप घेऊन भंडारा तहसीलमध्ये आली होती. मात्र तिला कोरोनाचे कारण पुढे करीत परत पाठविले होते.
प्रशासनाचा हा संवेदनशून्य व्यवहार ‘लोकमत’ने ‘महापुरात आई-वडील गमावलेल्या पाच भावंडांचा कोरोनात जगण्यासाठी संघर्ष’ या मथळ्याखाली वृत प्रकाशित केले. जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी या वृत्ताची तात्काळ दखल घेतली.
संबंधित यंत्रणेला योग्य कारवाई करून या भावंडांना तात्काळ पैसे देण्याचे निर्देश दिले. त्यानुसार बुधवारी लाखनीच्या शाखेतून दुर्गाने विड्राॅल केला. लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित झाल्यामुळेच ही मदत मिळाल्याचे त्यांना सहकार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते दिनेश वासनिक यांनी सांगितले.
लाखनी तहसीलदारांची सिपेवाडाला भेट
लाखनीचे तहसीलदार मल्लिक विराणी आणि गटविकास अधिकारी डाॅ. शेखर जाधव यांनी वृत्त प्रकाशित होताच मंगळवारी सिपेवाडा येथे जाऊन या पाच भावंडांची भेट घेतली. त्यांची आस्थेने विचारपूस केली. त्यांच्या शिक्षणासाठी पुढाकार घेण्यात आला असून कोणत्या योजनेतून त्यांना मदत देता येईल यावरही चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार या दोन संवेदनशील अधिकाऱ्यांनी एकप्रकारे या पाच भावंडांचे पालकत्व स्वीकारले.
अन् विड्राॅल स्लिपवर मागच्या बाजूला स्वाक्षरी
‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित झाल्यानंतर दुर्गा कांबळे या बालिकेला भंडारा येथे पाचारण करण्यात आले. तहसीलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांची विड्राॅल स्लिपवर स्वाक्षरी करण्यात आली. मोठ्या आशेने दुर्गा लाखनी येथे पोहचली. त्यावेळी तिला सांगण्यात आले विड्राॅल स्लिपच्या समोरच्या बाजूला स्वाक्षरी नाही. त्यामुळे विड्राॅल देता येणार नाही. शेवटी दुर्गा घरी परतली. ही चूक की जाणीवपुर्वक केलेला प्रकार तर नाही ना, अशी चर्चा आहे.