लोकमत न्यूज नेटवर्क सावरला : पवनी तालुक्यात मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे व गोसे धरणातील अतिरिक्त सोडलेल्या पाण्यामुळे वैनगंगा नदी काठाजवळील शेतीचे नुकसान झाले. शासनाने मागील वर्षी पूर पीडित शेतकऱ्यांची यादी बनवली. ती यादी यावर्षी प्रकाशित करण्यात आली. परंतु, यादीत अनेकांची नावे समाविष्ट नाहीत. कित्येकांची नावे सुटलेली आहेत.
ज्या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले व पुराचे पाणी शेतामध्ये शिरले होते, अशा शेतकऱ्यांना यादीतून वगळण्यात आले. अशाच प्रकार गावागावांमध्ये दिसून येत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. नदीकाठावरील गावामध्ये नुकसानीचे सर्वेक्षण बरोबर झालेले नसल्याचे समजून येते. एकदा यादी बनल्यानंतर त्या यादीतून नावे का गाळले जातात, असा प्रश्न आता विचारला जात आहे.
संबंधित कर्मचाऱ्यांनी मोक्यावर न जाता अंदाजाने व आपल्या मर्जीतील लोकांना या यादीमध्ये समाविष्ट केल्याचे दिसून येते. त्यामुळे त्या शेतकऱ्यांची मागील वर्षाच्या पूरग्रस्तांच्या यादीत नावे नाहीत, त्यांचे पुन्हा सर्वेक्षण करण्यात यावे, शासन- प्रशासनाने दखल घेऊन नावे सुटलेल्या शेतकऱ्यांची त्वरित यादी बनवण्यात यावी आणि ती यादी शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात यावी, अशी मागणी होत आहे.