लाखांदूर :
गतवर्षीच्या खरीप हंगामात पूर, अतिवृष्टी , अवकाळी पाऊस यांसह अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासन मदतनिधी उपलब्ध करुन शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग देखील करण्यात आला. मात्र बहुतांश शेतकऱ्यांचे बँक खाती सदोष आढळून आल्याने पूरग्रस्त शेतकरी शासन मदतीपासून वंचित ठरले असतानाच विविध कारणांनी तालुक्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांनी सदर मदत नाकारल्याने पूरग्रस्त शेतकऱ्यांचा साडेतीन कोटीचा मदतनिधी शासनाला परत गेला आहे.
माहितीनुसार, गतवर्षीच्या खरिपात पीक पेरणी ते कापणी पर्यंतच्या हंगामात तीनदा पूर, अवकाळी पाऊस व अतिवृष्टी झाल्याने मोठ्या प्रमाणात शेतपिकांचे नुकसान झाले होते. या प्रकरणी शेतकऱ्यांनी शासनाकडे नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसान भरपाईची मागणी केली होती.
सदर मागणीची दखल घेत शासनाने तालुक्यातील क्षतीग्रस्त शेतकऱ्यांसाठी सुमारे १२ कोटी ६८ लक्ष ७ हजार रुपयाचा शासन मदत निधी तालुका प्रशासनाला उपलब्ध करुन दिला होता. सदर निधी उपलब्ध होताच खरिपात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतपिकांच्या झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण व पंचनाम्याच्या आधारावर पीडित शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या.
सदर याद्या प्रसिद्ध करतानाच बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये तालुका प्रशासना अंतर्गत सुमारे ९ कोटी २६ लाख ६० हजार १८९ रुपयांचा मदतनिधी जमा करण्यात आला आहे. मात्र शेतकऱ्यांनी शासन मदतनिधी उपलब्ध होण्यासाठी महसूल प्रशासनाकडे दिलेले बँक खाते क्रमांकात प्रशासकीय कारवाई दरम्यान नकळत चूक झाल्याने बँके अंतर्गत संबंधित निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात अडचणी निर्माण झाल्याचे बोलल्या जात आहे.
दरम्यान , तब्बल ६ महिन्यापासून बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये शासन मदतनिधी जमा न झाल्याने तालुक्यातील सोनी, इंदोरा , सावरगाव यांसह अन्य काही गावातील शेतकऱ्यांनी शासन मदतनिधी पासून वंचित ठरल्याच्या आरोप केला आहे. त्यानुसार येथील तहसील प्रशासनाने तत्काळ चौकशी प्रक्रिया आरंभून मदतीपासून वंचित शेतकऱ्यांना शासन मदतनिधी उपलब्ध होण्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरु केली आहे.
सदर कार्यवाही अंतर्गत येत्या काही दिवसात मदतीपासून वंचित शेतकऱ्यांना शासन मदत उपलब्ध केली जाणार असल्याची माहिती आहे. तथापि तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी विविध कारणांनी सदर शासन मदत नाकारल्याने सुमारे ३ कोटी ४१ लाख ४६ हजार ८११ रुपयाचा शासन निधी शासनाला परत करण्यात आला.
प्रतिक्रिया : शासनाकडून उपलब्ध निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यासाठी तालुक्यातील बँकांना निधी उपलब्ध केला आहे मात्र काही शेतकऱ्यांची बँक खाती सदोष आढळून येत असल्याने बँक खात्यातील दोष दूर करण्यासाठी आवश्यक कारवाई सुरु करण्यात आली असून पुढील काही दिवसात वंचित शेतकऱ्यांना शासन मदत उपलब्ध होणार आहे.
- अखिलभारत मेश्राम, तहसीलदार लाखांदूर.