तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा
चुल्हाड ( सिहोरा ) : सिहोरा परिसरात असणाऱ्या वैनगंगा, बावणथडी नद्यांच्या काठावरील गावांत ऐन पावसाळ्यात पुराचे पाणी गाव आणि शेतशिवात शिरले होते. घरांत पाणी शिरल्यान अनेकांचे संसार उघड्यावर आले होते. पुराने बाधित कुटुंबीयांना अद्याप सानुग्रह आर्थिक मदत मिळाली नाही. यामुळे नुकसानग्रस्त कुटुंबीयांना तत्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष देवेंद्र मेश्राम यांनी केली आहे. नुकसानग्रस्त कुटुंबीयांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.
सिहोरा परिसरात वैनगंगा, बावणथडी नद्यांच्या काठावर असणाऱ्या गावांत ऐन पावसाळ्यात पुराचे पाणी शिरले होते, शेतशिवारात पूरपाण्याने थैमान घातल्यानंतर शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत दिली आहे. शेतकऱ्यांना राज्य सरकारने आधार देण्याचा प्रयत्न केला आहे. एकरी देण्यात आलेली सानुग्रह आर्थिक मदत आखडती असली तरी दुःखातून सावरण्यासाठी मोलाची ठरली आहे. परंतु पुराच्या पाण्याने बाधित कुटुंबीयांना मात्र वाऱ्यावर सोडण्यात आले आहे. गावात आणि घरात पाणी शिरल्यानंतर अनेकांचे संसार उघड्यावर आले होते. पूरग्रस्तांनी समाजमंदिर, शाळा तथा अन्य सुरक्षित जागेत आठवडाभर दिवस काढले होते. खाण्या-पिण्याचे वांदे कुटुंबीयांनी अनुभवले. पुराचे पाणी गावात तब्बल तीन दिवस होते. या कालावधीत अनेकांचे घरही कोसळले. दरम्यान शाळेत वास्तव्यास असणाऱ्या बाधित कुटुंबांना शासनाने तांदूळ आणि गहू वितरित केले होते परंतु भरीव आर्थिक मदत मिळालेली नाही. बाधित कुटुंबियांचे तलाठीमार्फत सर्वेक्षण करण्यात आले. पिपरी चूनही, चुल्हाड, परसवाडा, देवरी देव, गोंडीटोला, सुकळी नकुल, बपेरा, देवसरा, वरपिंडकेपार, सोंड्या, ब्राह्मणटोला, सक्करधरा, कवलेवाडा, पाथरी आदी गावांची नोंद करण्यात आली आहे. या गावांतील नुकसानग्रस्त कुटुंबीयांना सानुग्रह आर्थिक मदत अद्याप मिळालेली नाही. सर्वेक्षणानंतर नागरिकांना ५ हजार रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु एक छदामही हाती पडला नाही. यामुळे बाधित कुटुंबीयांत असंतोष खदखदत आहे. दरम्यान, बाधित कुटुंब रोज बॅंकेच्या चकरा मारत आहेत. लोकप्रतिनिधींकडे अजीजी करीत आहेत. परंतु कुणीही छातीठोकपणे सांगत नाही. यामुळे बाधित कुटुंबियांचे चेहरे कोमेजले आहेत. शासनाने तत्काळ आर्थिक मदत द्यावी अन्यथा तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष देवेंद्र मेश्राम यांच्यासह बपेरा पंचायत समिती क्षेत्रातील नागरिकांनी दिला आहे.
कोट
‘गोंडीटोला गावात नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरले होते. सर्वेक्षणात १४ कुटुंबीयांची नोंद करण्यात आली आहे. याशिवाय पुरवणी यादी १८ कुटुंबीयांची देण्यात आली असून, अद्याप त्यांना आर्थिक मदत मिळालेली नाही. ------- शीतल चिंचखेडे, सदस्य, ग्रामपंचायत, गोंडीटोला
कोट
नद्या, नाले आदींना आलेल्या पुराचे नुकसान झालेल्या नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले. शेतकऱ्यांना आखडती मदत देण्यात आली आहे. परंतु बाधित कुटुंबांना आर्थिक मदत त्यांचे बचत खात्यात अद्याप जमा झालेली नाही. आचारसंहिता घोषित होताच मदत लांबणीवर जाणार असल्याने तत्काळ दिली पाहिजे.
- किशोर राहगडाले / विनोद पटले, बपेरा