सहा महिन्यांचा कालावधी लोटला तरी अद्याप चिखली येथील मंगल हटवार, होमदास गायधने, रामदास हटवार, नारायण गायधने, संगीता फदे, जीवन हटवार, रामदास हटवार, दसाराम वाघमारे, खरबी येथील विकास सेवा सोसायटीचे अध्यक्ष अनिल बोरकर हे पूरग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहिले आहेत. ही मदत मिळवण्यासाठी भंडारा तहसील कार्यालयात चिखली येथील शेतकरी तथा भंडारा तालुका भाजपा ग्रामीणचे महामंत्री विष्णुदास हटवार यांनी वारंवार पाठपुरावा केला. त्यानंतर २१ जानेवारीला भंडारा तहसीलदारांनी बँक ऑफ इंडियाला १५१ पूरग्रस्त शेतकऱ्यांची यादी व धनादेश बँकेला पाठवला. यानंतर बँकेकडून राष्ट्रीयीकृत खाते असलेल्या शेतकऱ्यांचे पैसे त्वरित जमाही झाले. मात्र, यातील शहापूर येथे को-ऑपरेटिव्ह बँकेचे खातेदार असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात मात्र आजपर्यंतही मदत जमा झालेली नाही. बँकेकडून ४ फेब्रुवारीला भंडारा तहसीलदारांना पुन्हा यादी परत पाठवण्याची माहिती बँकेने दिली. त्यामुळे भंडारा तहसील कार्यालयात शेतकरी विचारपूस करायला गेले असता, तहसीलचे कर्मचारी बँकेकडे बोट दाखवतात, तर बँक पुन्हा तहसील कार्यालयाकडे बोट दाखवते. यामध्ये नाहक बळीराजाला पायपीट करावी लागत आहे. आधीच तोकडी मिळणारी मदत आणि खरिपातील अतोनात पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी चिंतेत आहेत. त्यात प्रशासनाच्या उदासीनतेचा फटकाही सहन करावा लागत आहे. भंडारा तहसील कार्यालयाने पुढाकार घेऊन मदत त्वरित जमा करावी, अशी मागणी भंडारा तालुका ग्रामीणचे भाजपा महामंत्री विष्णुदास हटवार, खरबी येथील विकास सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष अनिल बोरकर, मंगल हटवार, विनोद वाघमारे, नारायण गायधने, रामदास गायधने, संगीता फदे, जीवन हटवार, रामदास हटवार यांनी भंडाराचे तहसीलदार अक्षय पोयाम यांच्याकडे केली आहे.
कोट
पूरग्रस्त यादीत नाव आहे, पण अजूनही पैसे जमा झाले नाहीत. यासाठी भंडारा तहसील कार्यालय आणि बँकेत अनेकदा पाठपुरावा केला. मात्र, अद्याप माझ्या मुलाच्या खात्यात एक रुपयाही मदत जमा झाली नाही. आधीच शेतकरी संकटात आहे. त्यात प्रशासनाचा निष्काळजीपणा, त्यात आणखी भर घालत आहेत. तहसीलदारांनी याकडे लक्ष देऊन त्वरित मदत जमा करण्याची गरज आहे.
विष्णुदास हटवार, शेतकरी चिखली तथा भाजपा तालुका महामंत्री, भंडारा
कोट
राज्य सरकारने सप्टेंबरमध्ये बळीराजाला मदत दिली. आज सहा महिने गेले तरी ती मदत मिळाली नाही. प्रशासनाने बाकीची कामे सोडून शेतकऱ्यांचे काम पहिल्यांदा केले पाहिजे. मदत मिळाली नाही तर यासाठी आम्ही आंदोलन करणार आहोत.
अनिल बोरकर, विकास सेवा सोसायटी, अध्यक्ष, खरबीनाका
बॉक्स
अन्यथा रस्त्यावर उतरावे लागेल
खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या सोयाबीन, धान, भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर सरकारने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत दिली. यासाठी तलाठी, कृषी सहायकांनी पिकांचे पंचनामेही केले. मात्र, अनेक दिवसांनंतरही आज बँक आणि तहसील प्रशासनाच्या समन्वयाअभावी अनेक शेतकरी या मदतीपासून वंचित आहेत. भंडारा तालुक्यातील चिखली, खरबी येथील को-ऑपरेटिव्ह बँकेचे खाते असलेल्यांना अद्याप नुकसानभरपाईची मदत जमा झालेली नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आठवडाभरात पैसे जमा न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. बँक आणि तहसील प्रशासनाच्या समन्वयाअभावी नाहक शेतकऱ्यांना अनेकदा विचारपूस करण्यासाठी तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत, याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.