तुमसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावर देव्हाडी येथील रेल्वे क्रॉसिंग क्रमांक ५३२ वर उड्डाणपुलाचे बांधकाम गत सहा वर्षांपासून सुरू आहे. या पुलाच्या भरावात राखेचा वापर करण्यात आला. पावसाळ्यातही राख पाण्यासह पूलातून वाहून गेली. त्यामुळे पुलावर अनेक ठिकाणी खड्डे पडले. हे खड्डे भरण्यात आले. त्यानंतर त्यावर दगडी चुरी व सिमेंटचा वापर करून ते भरण्यात आले. संपूर्ण पुलाच्या पोचमार्गावर डांबरीकरण करण्यात आले. हा पूल दगडी असून, दगडातून राख वाहून गेली होती.
दगडातून राख वाहून जाण्याच्या शोध संबंधित विभागाने घेतला. त्यानंतर दगडाला सिमेंटचा वापर करून भेगा बुजविण्यात आल्या. त्यानंतरही दगडातून राख बाहेर येणे सुरूच होते. दगडातून राख बाहेर का येत आहे, या कारणाचा शोध घेण्याकरिता स्थापत्य अभियांत्रिकी विभागाने दिल्ली व मुंबई येथील आयआयटीचे तज्ज्ञांना पाचारण केले होते. त्यापैकी दिल्ली येथील आयआयटीचे तज्ज्ञ या पुलाची पाहणी करून गेले. परंतु मुंबई येथील आयआयटीचे तज्ज्ञ या पुलाच्या निरीक्षणाकरिता अजूनपर्यंत आले नाहीत, अशी माहिती आहे. दोन्ही तज्ज्ञ पथकांनी दिलेल्या अहवालानंतरच या पुलाचे भविष्य ठरणार होते. तज्ज्ञांच्या अहवालात पूल दुरुस्त करण्याच्या तांत्रिक बाबी तपासून बघणार येणार होत्या. काही ठिकाणी कायमस्वरूपी पुलातून निघालेल्या राखेसंदर्भात अत्याधुनिक पद्धतीने त्याची दुरुस्ती करण्यात येणार होती, असे कळते.
लॉकडाऊनच्या काळात गोंदिया मार्गावरील पोचमार्गाचे बांधकाम करण्यात आले. सध्या हे काम अंतिम टप्प्यात आहे. रेल्वे प्रशासनाने रेल्वे ट्रॅकवरील पुलाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. पूल बांधकामानंतर या पुलावरील वाहतूक प्रायोगिक स्वरूपात सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आहे. पुलातून राख निघण्याचे कारण येथे अद्याप गुलदस्त्यात असून, संबंधित विभागाने पूर्ण शंकानिरसन केल्यानंतरच पुलावरून वाहतूक सुरू करावी, असा सूर सध्या उमटत आहे.