लाखनी : स्थानिक वनपरिक्षेत्रातील रामपुरी बीटमधील मोगरा येथे दोन रानडुकरांची शिकार करून काही जण मांस विक्री करीत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर लाखनी वन कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी सापळा रचून धाड मारली. यावेळी तीन संशयित आरोपींना अटक करण्यात आली, तर इतर तीन जण पळून जाण्यात यशस्वी झाले.
वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना २१ मे रोजी पहाटेच्या सुमारास मोगरा जंगलात दोन रानडुकरांची शिकार झाल्याची माहिती मिळाली. डुकराचे मांस विक्री-खरेदी करण्यासाठी मोगरा येथील अनुसया बागडे यांच्या शेतशिवाराचा उपयोग करण्यात आला. दि. २१ रोजी सकाळी ९ वाजता वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाड मारली. याप्रकरणी
तीन संशयित आरोपींना अटक करण्यात आली, तर तीन जण पळून जाण्यात यशस्वी झाले.
संशयितांवर वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला. दिवसभरात वनविभागाने कारवाई करून नितेश राम रतन मेश्राम (३५, रा. मुरमाडी, तूप) , मार्तंड तिमा मेश्राम(६०, रा. मोगरा), आश्विन दाजीबा देशमुख(३५, रा. मुरमाडी, तूप) यांना वनविभागाने ताब्यात घेतले. उर्वरित संशयित आरोपींचा शोध सुरू आहे. डीएफओ भलावी, साहाय्यक वनसंरक्षक आर. पी. राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्राधिकारी ए. मेश्राम, क्षेत्र साहाय्यक डी. के. राऊत व इतर वन कर्मचाऱ्यांनी सापळा रचून आरोपींना रंगेहाथ पकडले. मांस खरेदी करणारे पळून गेले. शिकार करणाऱ्या टोळीची माहिती घेऊन पुढील कारवाई सुरू आहे.