गेल्या कित्येक दिवसांपासून ईटान येथील नदीपात्रातील रेतीची अवैध चोरटी वाहतूक सुरू असून रात्रंदिवस ट्रॅक्टरच्या साहाय्याने रेतीसाठा जमा केला जातो. असाच एक बेवारस रेतीसाठा विरली (बु.) ते ईटान मार्गावरील विरली (बु.) हद्दीत असलेल्या कालव्याच्या उजव्या बाजूला सहज नजरेस येणार नाही, अशा ठिकाणी होता. या माध्यमातून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडविला जातो.
याविषयी लोकमतने कालव्याच्या पाळीवर बेवारस रेतीसाठा या शीर्षकाखाली प्रकाशित केलेल्या वृत्ताची दखल घेऊन लाखांदूरच्या तहसीलदारांनी दुसऱ्या दिवशी विरली (बु.) येथील तलाठी व मंडळ निरीक्षकांना सदर रेतीसाठ्याची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले. मात्र, वृत्त प्रकाशित होताच संबंधित रेती तस्कराने त्याच दिवशी रात्रीतून सदर रेतीसाठ्याची विल्हेवाट लावली. येथील तलाठी आणि मंडळ निरीक्षकांनी दुसऱ्या दिवशी रेतीसाठ्याची थातूरमातूर चौकशी करून या ठिकाणी विखुरलेल्या अवस्थेत केवळ १ ब्रास रेती शिल्लक असल्याचे प्रतिवेदन तहसीलदारांना सादर केले.
बॉक्स
हा तर साप गेल्यावर भुई धोपटण्याचा प्रकार
तहसीलदारांनी वृत्त प्रकाशित होताच तातडीने कारवाईचे आदेश दिले असते तर सदर बेवारस रेतीसाठा जप्त करता आला असता. मात्र, तहसीलदारांनी आदेश देण्यासाठी दिरंगाई करून संबंधित रेती तस्कराला रेतीची विल्हेवाट लावण्यासाठी संधी दिली, असा जनतेचा आरोप आहे. त्यामुळे महसूल विभागाने केलेली ही कारवाई म्हणजे साप गेल्यावर भुई धोपटण्याचा प्रकार असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे.
कोट
महसूल विभागाची इतरही काही कामे असतात. त्यामुळे वृत्त प्रकाशित होताच तातडीने कारवाई करणे शक्य झाले नाही. तथापि, दुसऱ्या दिवशी आमचे मंडळ अधिकारी व तलाठ्यांनी केलेल्या चौकशीत त्या ठिकाणी विखुरलेल्या अवस्थेत केवळ एक ब्रास रेती आढळून आली.
अखिलभारत मेश्राम, तहसीलदार, लाखांदूर