हरिश्चंद्र कोरे
भंडारा : गत आठवडाभरापासून विरली परिसरातील अनेक गावांमध्ये वाघाचे दर्शन घडत आहे. वाघ दिसल्याची माहिती मिळताच वन विभाग तातडीने घटनास्थळ गाठून वाघ शोधण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, या शोधमोहिमेत वन विभागाला अद्याप यश आलेले नाही. परिणामी, परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, शेतीची कामे प्रभावित झाली आहेत.
सर्वप्रथम १२ जानेवारी रोजी ढोलसर येथे वाघाच्या पाऊलखुणा आढळल्या. त्यानंतर रोजच शेतशिवारात अनेकांना वाघाचे दर्शन झाले. गुरुवारी विरली शेतशिवारात शेतमजुरांना दोनदा वेगवेगळ्या ठिकाणी वाघाचे दर्शन झाले. त्यानंतर शुक्रवारी येथील वामन राऊत यांना शेतात वाघ दिसल्याने त्यांची घाबरगुंडी उडाली. त्यांनी कसेबसे गाव गाठले खरे; पण भीतीमुळे त्यांचा रक्तदाब वाढल्याने त्यांना रुग्णालयात न्यावे लागले.
या घटनांची तातडीने दखल घेऊन वन विभागाने वाघाचा शोध घेण्याचा आटोकाट प्रयत्न केला. यावेळी वन विभागाने घटनास्थळापासून दोन कि.मी.चा परिसर पिंजून काढला. मात्र, या शोधमोहिमेत वन विभागाला यश आले नाही. त्यामुळे वैतागलेल्या अधिकाऱ्यांनी तो वाघ नसून लांडगा असल्याचा निष्कर्ष काढला.
मात्र, या निष्कर्षावर जनतेचा आक्षेप असून, हा निष्कर्ष म्हणजे आपल्या अपयशावर पांघरुण घालण्याचा वन विभागाचा प्रयत्न असल्याचा जनतेचा आरोप आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे सरांडी (बु.) येथील एका शेतकऱ्याने हा वाघ आपल्या मोबाइलच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे.
परिसरात दहशत
परिसरात वारंवार वाघाचे दर्शन घडत असल्यामुळे दहशतीचे वातावरण पसरले आहे. सध्या या परिसरात तुरी तोडण्याचे काम जोमात सुरू आहे. मात्र, वाघाच्या भीतीमुळे मजूर शेतात जाण्यास घाबरत असल्याने शेतीची कामे प्रभावित झाली आहेत.
शोधमोहिमेत कुठेही वाघाच्या पाऊलखुणा अथवा वाघ आढळून आला नाही. डोकेसरांडी येथे शेळीच्या शिकार प्रकरणातील घटनास्थळी लांडग्याच्या पाऊलखुणा आढळून आल्या.
- रूपेश गावित, वन परिक्षेत्र अधिकारी, लाखांदूर