लाखांदूर: तालुक्यातील मोहरणा शेतशिवारात दिवसभर ठिय्या मांडून बसलेल्या वाघाच्या बंदोबस्तासाठी लाखांदूर वनविभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी मचाण बांधून रात्रभर गस्त चालविल्याची माहिती आहे.
२३ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास एक पाच वर्षीय पट्टेदार वाघ मोहरणा शेतशिवारात आढळून आला.
सदर वाघ आढळून येताच गावकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण होऊन सदर वाघाच्या बंदोबस्तासाठी लाखांदूर वनविभागाला पाचारण करण्यात आले. त्यानुसार, लाखांदूरचे वनपरिक्षेत्राधिकारी रूपेश गावित, वनरक्षक एस.जी.खन्डागळे, जी.डी.हाते, वाहनचालक प्रफुल्ल राऊत यांसह अन्य अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. एवढेच नव्हे, तर शेतशिवारात नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी पोलिसांनाही बोलविण्यात आले आहे. वाघ मोहरणा येथील प्रशांत राऊत नामक शेतकऱ्याच्या मालकी शेतालगतच्या नाल्यातील झुडपात दडी मारून बसला असल्याची माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली आहे. सदर वाघ सकाळच्या ९ वाजतापासून शेतशिवारातील झुडपात दडी मारून असल्याने, रात्रीच्या सुमारास शिकारीच्या शोधात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी सतर्कतेची उपाययोजना म्हणून वन अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शेतशिवारात मचाण बांधून रात्रभर गस्त चालविली आहे.
दरम्यान, सदर वाघ वैनगंगा नदीपलीकडील आंतर जिल्ह्यातील जंगलव्याप्त भागातून शिकारीच्या शोधात भटकला असावा, अशी अंदाजात्मक चर्चा आहे. मात्र, तब्बल दहा वर्षांनंतर चौरासव्याप्त मोहरणा शेतशिवारात पाचवर्षीय पट्टेदार दडी मारून बसल्याने, संबंध परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या रब्बी पीक काढणी व उन्हाळी धान पीक रोवणीची कामे जोरात सुरू असताना, दिवसाच्या सुमारास अथवा रात्रीच्या सुमारास कृषिपंप सुरू करण्यासाठी शेतावर जाणाऱ्या शेतकऱ्यांना धोका होऊ नये, यासाठी वनविभागाने शेतकरी जनतेला सतर्कतेचे आवाहन केले आहे.
तथापि सदर वाघाचा बंदोबस्त लावण्यासाठी मोहरणा शेतशिवारात तूर्तास रात्रीच्या गस्तीसाठी वाघ दडी मारून असलेल्या शेतशिवार परिसरात मचाण उभारण्यात आले असून, वनाधिकारी व कर्मचारी संबंधित वाघावर पाळत ठेवून असल्याची माहिती देण्यात आली आहे.