आॅनलाईन लोकमतभंडारा : भंडारा पंचायत समितीचे माजी उपसभापती ललीत बोंद्रे यांनी पंचायत समितीच्या समाज कल्याण विभागातील जितेंद्र नंदागवळी या कर्मचाऱ्याला शिवीगाळ करीत त्यांच्यावर हात उगारला. ही घटना मंगळवारला दुपारी भंडारा पंचायत समितीमध्ये घडली.पंचायत समितीच्या समाज कल्याण विभागात कनिष्ठ सहाय्यक म्हणून कार्यरत जितेंद्र नंदागवळी हे नित्याप्रमाणे त्यांच्या कक्षात काम करीत होते. दरम्यान माजी उपसभापती ललीत बोंद्रे हे पंचायत समितीमध्ये आले. पदाधिकाऱ्यांच्या कक्षात बसून नंदागवळी यांना बोलाविले. यावेळी नंदागवळी हे कामामध्ये व्यस्त असल्यामुळे त्यांना १० मिनिटांचा उशिर झाला. त्यामुळे ललीत बोंद्रे यांनी नंदागवळी यांना शिवीगाळ केली. यावेळी नंदागवळी यांनी त्यांना शिवीगाळ न करण्याची विनंती केली असता बोंद्रे यांनी त्यांच्यावर हात उगारला. मात्र समयसूचकतेने पुढची घटना टळली. दरम्यान, नंदागवळी हे या वादातून बाहेर पडत कक्षाकडे निघाले असताना बोंद्रे यांनी पुन्हा शिवीगाळ करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा पंचायत समितीमध्ये होती. या प्रकारामुळे नंदागवळी यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद कर्मचारी समन्वय कृती समिती पदाधिकारी व पंचायत समिती कर्मचाºयांची बैठक पंचायत समितीत सायंकाळी घेण्यात आली. यावेळी कृती समितीचे अध्यक्ष प्रभाकर कळंबे, सचिव टी.सी. बोरकर, जिल्हा संघटक अतुल वर्मा, संदीप महाकाळकर, ढेंगे, नितीन जोशी, माळवी, विस्तार अधिकारी (पंचायत) हुमणे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. या बैठकीत या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. बुधवारला सर्व कर्मचारी काळ्या फिती लावून काम करतील व याबाबत बोंद्रे यांच्यावर कारवाई करण्याच्या अनुषंगाने मुख्य कार्यपालन अधिकारी व खंडविकास अधिकारी यांना निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ जिल्ह्यातील सातही पंचायत समितीमधील कामकाज बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती मनिष वाहणे यांनी ‘लोकमत’ला दिली.पदाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांकडे कामाची विचारणा करण्याऐवजी अधिकाऱ्यांकडे विचारणा करावी. कुठल्याही कर्मचाऱ्याने कामे प्रलंबित न ठेवता ती वेळेत पूर्ण करावी. बोंद्रे यांच्याकडून झालेला प्रकार निंदनीय असून असा प्रकार घडू नये, यासाठी सर्व कर्मचारी संघटीत लढा देतील.- प्रभाकर कळंबे, अध्यक्ष समन्वय कृती समिती, भंडारा.समाजकल्याण विभागाचे नंदागवळी हे कधीही त्यांच्या कक्षात उपस्थित राहत नाही. लोकप्रतिनिधी असल्याने सर्वसामान्यांच्या कामाबाबत त्यांना विचारणा केली. यावेळी त्यांनी उडवाउडवीचे व हेकेखोरपणाचे उत्तर दिली. त्यामुळे जनतेच्या कामासाठी मी त्यांना बोललो, मात्र हात उगारला नाही.- ललीत बोंद्रे, माजी उपसभापती, पं.स. भंडारा.
माजी उपसभापतीने उगारला कर्मचाऱ्यावर हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 12:48 AM
भंडारा पंचायत समितीचे माजी उपसभापती ललीत बोंद्रे यांनी पंचायत समितीच्या समाज कल्याण विभागातील जितेंद्र नंदागवळी या कर्मचाऱ्याला शिवीगाळ करीत त्यांच्यावर हात उगारला.
ठळक मुद्देभंडारा पं.स.तील प्रकार : बुधवारी कर्मचारी करणार निदर्शने