भंडारा जिल्ह्यातील काँग्रेसचे माजी खासदार केशवराव पारधी यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 12:38 PM2018-07-30T12:38:24+5:302018-07-30T12:40:42+5:30
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार केशवराव आत्माराम पारधी यांचे रविवारी सायंकाळी ६.३० वाजता तुमसर येथे निवासस्थानी हृदयविकाराने निधन झाले. ते ९० वर्षाचे होते. त्यांनी भंडारा लोकसभेचे दोनदा, तुमसर विधानसभेचे दोनदा आणि तुमसरचे नगराध्यक्षपदही दोनदा भुषविले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार केशवराव आत्माराम पारधी यांचे रविवारी सायंकाळी ६.३० वाजता तुमसर येथे निवासस्थानी हृदयविकाराने निधन झाले. ते ९० वर्षाचे होते. त्यांनी भंडारा लोकसभेचे दोनदा, तुमसर विधानसभेचे दोनदा आणि तुमसरचे नगराध्यक्षपदही दोनदा भुषविले होते.
जुन्या काळातील काँग्रेसचे निष्ठावंत नेते आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे निकटस्थ केशवराव पारधी यांच्या निधनाचे वृत्त कळताच जिल्ह्यावर शोककळा पसरली. रविवारी दिवसभर त्यांची दिनचर्या व्यवस्थीत होती. सायंकाळी ६.३० वाजता त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि त्यातच हृदयविकाराचा धक्का बसून मृत्यू झाला. अत्यंत सामान्य स्थितीत असलेल्या कुटूंबात त्यांचा जन्म झाला होता. काही वर्ष त्यांनी तुमसरचे प्रसिध्द उद्योगपती दुर्गाप्रसाद सराफ यांच्याकडे नोकरी केली होती. मृदभाषी केशवराव पारधी यांनी राजकारणाची सुरुवात तुमसर नगरपरिषदेतून केली होती. नगराध्यक्ष ते आमदार, खासदार असा त्यांचा राजकीय प्रवास होता.
आणीबाणीच्या काळात केशवराव माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सोबत भक्कमपणे उभे होते. तुमसरात प्रथमच इंदिरा गांधी त्यांच्या प्रचारासाठी आल्या होत्या. गांधी कुटूंबियांशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी त्यांना दुसऱ्यांदा खासदारकीची तिकीट दिली होती. १९८९ मध्ये त्यांचा लोकसभेत पराभव झाला त्यानंतर माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी त्यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली होती.
केशवराव पारधी यांच्या मागे तीन मुले, एक मुलगी असा आप्त परिवार आहे. सोमवार ३० जुलै रोजी १२.३० वाजता त्यांच्या पार्थिवावर तुमसर येथील वैनगंगा घाटावर अत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
अल्प परिचय
माजी खासदार केशवराव पारधी यांचा जन्म ३१ आॅगस्ट १९२९ रोजी झाला होता. ते १९६४ ते १९६७ व १९७० ते १९७२ पर्यंत तुमसरचे नगराध्यक्ष होते. १९६७ ते १९७८ पर्यंत सलग दोनदा आमदार होते. १९७९ ते १९८९ या काळात त्यांनी भंडारा लोकसभेचे प्रतिनिधीत्व केले.