आॅनलाईन लोकमतचिचाळ : राष्ट्रवादी काँग्रेसचे पवनी तालुक्यातील नेते, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्य राजेश किसनजी डोंगरे (६५) यांचे सोमवारला (दि.१२ फेब्रुवारी) रात्री ११ वाजताच्या सुमारास दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी जिल्हा परिषद सदस्या पारबता डोंगरे, चार मुले, सुना, नातवंडे असा आप्त परिवार आहे.पवनी तालुक्यात राष्ट्रवादी काँगे्रेसचे ज्येष्ठ नेते असलेले राजेश डोंगरे यांना मागील दोन महिन्यांपूर्वी आजाराने ग्रासले होते. तेव्हापासून त्यांच्यावर नागपूर, मुंबई येथे उपचार सुरू होते. त्यापूर्वी त्यांनी अमेरिका येथेही उपचार केले होते. दरम्यान नागपूर येथे उपचार सुरू असताना सोमवारला रात्री त्यांना गोसेबुज येथे घरी आणण्यात आले. त्यानंतर रात्री ११ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे पवनीत तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची अपरिमीत हानी झाली आहे.राजेश डोंगरे हे गोसेबुज ग्रामपंचायतचे सदस्य ते सरपंचपदासह जिल्हा परिषदेचे दोनवेळा सदस्य राहिले. महिनाभरापूर्वीपर्यंत ते जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. पवनी बाजार समितीचे दोनवेळा तर पवनी खरेदी विक्री संस्थेचे दोनवेळा संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. याशिवाय विनोद शिक्षण संस्थेचे ते सचिव होते. पाच वर्षे त्यांनी प्राचार्यपदही सांभाळले होते. गोसेबुज बौद्ध पंचकमेटी व बौद्ध विहाराचे त्यांनी १५ वर्षे अध्यक्षपद सांभाळले होते.मंगळवारला दुपारी त्यांच्या पार्थिवावर गोसेबुज येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आमदार रामचंद्र अवसरे, माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, माजी आमदार राजेंद्र जैन, जि.प. उपाध्यक्ष विवेकानंद कुर्झेकर, धनंजय दलाल, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, अशोक मोहरकर, माजी सभापती नरेश डहारे, हिरालाल खोब्रागडे, सरपंच लोपमुद्रा वैरागडे, गंगाधर जिभकाटे, श्रीराम घोळके, रूपचंद उके, मनोज कोवासे यांच्यासह पवनी तालुक्यातील व जिल्ह्यातील राजकीय पदाधिकारी, सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
जि.प.चे माजी उपाध्यक्ष राजेश डोंगरे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 11:18 PM