भंडारा : पवनी तालुक्यातील बेटाळा घाटावर कारवाईसाठी गेलेल्या उपविभागीय अधिकाऱ्यांवर तब्बल २२ रेती तस्करांनी हल्ला केल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. आतापर्यंत केवळ चौघांनाच अटक करण्यात आली आहे. त्यांना २ मेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली असून, पसार आरोपींच्या शोधासाठी तीन पथके रवाना झाली आहेत.
भंडाऱ्याचे उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड यांच्यावर बुधवारी पहाटे ३.३० वाजता पवनी तालुक्यातील बेटाळा येथे रेती तस्करांनी हल्ला केला होता. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली. एसडीओ राठोड यांनी दिलेल्या तक्रारीत नऊ रेती तस्करांची नावे देण्यात आली होती, तर इतर १५ ते २० हल्लेखोर असल्याचे म्हटले होते. याप्रकरणी पोलिसांनी गुरुवारी राजू मेंगरे, धर्मा नखाते आणि राहुल काटेखाये या तिघांना अटक केली होती. तर शुक्रवारी प्रशांत मुलचंद मोहरकर रा. जुनोना याला अटक करण्यात आली. त्यांनी दिलेल्या माहितीवरून हल्लेखोरांची संख्या २२ असल्याचे पुढे आले. या हल्लेखोरात भोला बुक्कावन, दिनेश बांगडकर, आकाश पंचभाई, गणेश मुंडले, अक्षय तलमले, सागर बरडे, प्रदीप भोंदे, मंगेश नागरीकर, भुते यांचा दिवाणजी, प्रणय तलमले, चेतन बावनकर, भूषण भुरे, जितू तलमले, प्रतीक नागपुरे, गणेश जुनघरे, नितीन जुनघरे, विक्रम हटवार, अमोल भोंदे यांचा समावेश होता.
चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांना शुक्रवारी पवनी न्यायालयापुढे हजर केले असता २ मेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. तर पसार झालेल्या रेती तस्करांचा शोधासाठी तीन पथके नागपूरकडे रवाना झाली आहेत.
यापुढे महसूल पथकाला पोलीस संरक्षण
जिल्ह्यात रेती तस्करीप्रकरणी कारवाई करण्यासाठी जाणाऱ्या महसूल पथकाला हत्यारबंद पोलीस शिपाई दिले जातील, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी दिली. रेती तस्करांविरुद्ध लवकरच मोहीम उघडली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.