ज्ञानेश्वर मुंदे -भंडारा : जिल्हा सामान्य रुग्णालयातील अग्निकांडात बेचिराख झालेल्या विशेष नवजात अतिदक्षता कक्षाच्या (एसएनसीयू) पुनर्निर्माणासाठी तब्बल चार कोटी रुपये लागणार असल्याची माहिती आहे. आगीत फोटोथेरपी युनिट, रेडियण्ट वॉर्मर, सी टॅप मशीन असे साहित्य भस्मसात झाले होते. या महागड्या मशीन खरेदी करून हा कक्ष सुरू करण्याचे आव्हान रुग्णालय प्रशासनापुढे आहे. स्ट्रक्चरल ऑडिट, प्रस्ताव, निधी मंजूर होणे ही सगळी दिव्ये पार पाडावी लागतील. सध्या नवजात बाळांवर उपचार करण्यात मात्र त्यामुळे अडचणी येत आहेत.आगीत संपूर्ण कक्षाचीच राखरांगोळी झाली आहे. घटनेनंतर हा कक्ष सील करण्यात आला आहे. आगीचे मुख्य कारणच या कक्षात दडले असून, उच्चस्तरीय चौकशी समितीसह विविध तज्ज्ञ या कक्षाला भेट देत आहेत. रुग्णालयात ‘एसएनसीयू’ कक्ष अत्यावश्यक असतो. या कक्षाच्या पुनर्निर्माणासाठी सुमारे चार कोटी रुपयांची आवश्यकता आहे. यासाठी रुग्णालय प्रशासनाने अहवाल तयार केल्याची माहिती आहे. शासनाकडून निधी प्राप्त होताच या कक्षाच्या पुनर्निर्माणाला प्रारंभ होणार आहे. तूर्तास हा कक्ष तात्पुरत्या स्वरूपात कोविड ब्लॉकजवळ हलविण्यात आला आहे. मात्र, येथे पुरेशा सुविधा नाहीत. त्यामुळे नवजात बाळांवर विशेष उपचार करणे रुग्णालय प्रशासनाला कठीण जात आहे.
स्ट्रक्चरल ऑडिटवर भविष्य अवलंबून‘एसएनसीयू’ कक्ष आग लागलेल्या कक्षात सुरू करायचा की नवीन ठिकाणी हे स्ट्रक्चरल ऑडिटनंतरच ठरणार आहे. त्यासाठी बांधकाम विभागाला रुग्णालय प्रशासनाने पत्र दिल्याची माहिती आहे; मात्र सध्या चौकशी सुरू असल्याने आग लागलेला कक्ष आहे त्या स्थितीत आहे. चौकशी संपल्यानंतर त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट केले जाईल व कक्षाच्या पुनर्निर्माणासंदर्भात निर्णय घेण्यात येईल.