भंडारा : कलर स्कॅनर प्रिंटर वरून ५०, १०० व ५०० रुपयांच्या नकली चलनी नोटा छापल्याचे प्रकरण लाखांदुरात उघडकीस आले. यात आरोपींनी मोबाइल फोनमधील यू-ट्युबवरून नकली चलनी नोटा बनविण्याचे तंत्र शोधून नोटा बनविण्यासाठी आवश्यक साहित्य जमा करीत ५०, १०० व ५०० रुपयांच्या नकली नोटा छापल्याची कबुली आरोपींनी पोलीस तपासात दिली आहे. याप्रकरणी गुरुवारी चौघांनाही लाखांदूर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने सर्वांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
२३ ते २८ डिसेंबर दरम्यान लाखांदूर प्लॉट येथे प्रीतम गोंडाणे (२१, रा. मासळ), रोहित विनायक रामटेके (१९, रा लाखांदूर), मोहम्मद आसीम अब्दुल आसीफ शेख (२१, रा. वाडी, नागपूर) व सिनू उर्फ सुबोध मेश्राम (२१, रा. वाडी, नागपूर) यांनी संगनमताने ५०, १०० व ५०० रुपयांच्या नकली चलनी नोटा कलर स्कॅनर प्रिंटरवरून छापल्या होत्या.
याची गुप्त माहिती स्थानिक लाखांदूर पोलिसांना होताच येथील ठाणेदार रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक संदीप ताराम, पोलीस अंमलदार मनीष चव्हान, उमेश शिवणकर, राहुल गायधने, मिलिंद बोरकर आदी पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी जलदगतीने तपासकार्य आरंभ केला. यावेळी पोलिसांनी आरोपीतांकडून ३ एडी १०१३१३ अनुक्रमांकाची ५० रुपयांची एक नकली नोट, ८ एएम९६८५७३ अनुक्रमांकाची १०० रुपयाची १ नोट व अन्य एक १०० रुपयाची एका बाजुने छापलेली नोट तसेच ९ डल्ब्यूयू २६९३८० व २ डीएन ६९७३२१ क्रमांकाचे ५०० रुपयांचे दोन नोटासहित कलर स्कॅनर प्रिंटर व अन्य १४ प्रकारचे साहित्य जप्त करुन आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली. यावेळी आरोपींनी स्वतःच्या मोबाइल फोनमधून यू-ट्युबवरून नकली चलनी नोटा बनविण्याचे तंत्र शोधून स्कॅनर कलर प्रिंटरहून नकली नोटा तयार केल्याची कबुली दिली.
घरमालकालाही दिली ५०० रुपयांची नकली नोट
स्थानिक लाखांदुरात कलर स्कॅनर प्रिंटरवरून ५०, १०० व ५०० रुपयांच्या नकली नोटा छापण्यासाठी उपयोगी कलर स्कॅनर प्रिंटर गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी तालुक्यातील धाबेटेकडी येथील भाड्याने घेतलेल्या एका इसमाचे घरी लपवुन ठेवले होते. घराचे घरभाडे अदा करतानी आरोपींनी चक्क घरमालकालाही ५०० रुपयांची नकली चलनी नोट दिल्याची माहिती पोलीस चौकशीत उघड झाली आहे.