भंडारा : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या दरात दिवसागणिक दरवाढ होत आहे. मागील चार महिन्यांचा विचार करता पेट्रोल पाच रुपये, तर डिझेल सहा रुपये प्रतिलीटरने महागले आहे. फक्त पेट्रोल-डिझेलमध्येच दरवाढ झाली नसून घरगुती गॅस सिलिंडरचे दर चक्क शंभर रुपयांनी वाढले असल्याने सर्वसामान्यांचे संसाराचे गणित कोलमडले आहे. वाढत्या महागाईचा अनेकांना फटका बसत आहे. दररोज काम करून खाणाऱ्या नागरिकांचे तर पेट्रोल आणि गॅसच्या दरवाढीमुळे महिन्याचे बजेट कोलमडून गेले आहे.
गॅस सिलिंडरच्या दरवाढीने आता ग्रामीण भागात पुन्हा एकदा चुली पेटल्याचे चित्र दिसून येत आहे. जिल्ह्यात दररोज पेट्रोल, डिझेलच्या दरात काही ना काही दरवाढ होत आहे. गेल्या महिनाभरापासून दरवाढीचा आलेख हा चढताच राहिला आहे. सोमवारी भंडारा शहरातील पेट्रोल ९३.५० रुपये, तर डिझेल ८२.५० रुपये प्रतिलीटर होते. गेल्या चार महिन्यांपासून वाढत्या महागाईचा विचार केला असता पेट्रोल नोव्हेंबर महिन्यात ८८.१८ रुपये होते, तर डिझेल ७६.१८ रुपये तर डिसेंबर महिन्यात दरवाढ होत ९०.८० रुपये प्रतिलीटर पेट्रोल तर डिझेल ७९.७८ रुपये प्रतिलीटर झाले होते. त्यानंतर जानेवारी महिन्यात पेट्रोल ९०.८९ तर डिझेल ७९.७८ झाले होते. आता फेब्रुवारी महिना सुरू होताच पेट्रोल ९३.३० रुपये प्रतिलीटर, तर डिझेल ८२.५० रुपये प्रतिलीटर झाले आहे. म्हणजेच दिवसागणिक वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या किमतीचा परिणाम हा मार्केटवरही दिसून येत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मिळणाऱ्या जीवनावश्यक वस्तूही महागल्या असल्याचे चित्र बाजारात दिसून येत आहे. त्यामुळे सरकारने वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या किमतींवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. आता विविध राजकीय पक्षांनी आंदोलने करायला सुरुवात केली असली तरी वाढलेले दर मात्र आता खाली येण्याची चिन्हे दिसून येत नाहीत.
कोट
दिवसेंदिवस वाढणारे पेट्रोल-डिझेलचे दर हे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडत आहे. कोरोना संसर्ग कमी झाल्यानंतर आता कुठे संसाराची घडी बसली होती. मात्र पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या किमतीमध्ये गोरगरिबांचे हाल होत आहेत.
किशोर ठवकर, सामाजिक कार्यकर्ते, खमारी
कोरोनाच्या काळात संपूर्ण जग ठप्प होते. वाहतूक व्यवस्था बंद झाली होती. मात्र त्यानंतर आता वाढत्या महागाईच्या संकटाने जगणे मुश्कील झाले आहे. सागर मेश्राम, भंडारा
पेट्रोल-डिझेलचे दर हे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. गॅस सिलिंडरच्या किमतीत जवळपास शंभर रुपयांनी दरवाढ झाली आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत गरिबांनी जगावे का मरावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दीपाली संजय आकरे, सामाजिक कार्यकर्त्या, खरबी नाका