भंडारा : रुबाबदार रुद्रा वाघाच्यामृत्यू प्रकरणाचा वनविभागाने शिकाऱ्यांवरील पाश अधिकच घट्ट आवळल्याचे दिसून येत आहे. शनिवारी दुपारी एकाला अटक केल्यानंतर सहा तासांच्या आत अजून चौघांना पकडण्यात वन विभागाला यश आले आहे. त्यामुळे आता अटक केलेल्या एकूण आरोपीतांची संख्या पाच झाली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तींकडून अधिकची माहिती गोळा करण्याचे कार्य सुरू असून अन्य प्रकरणांचाही उलगडा होणार काय? अशी चर्चा आहे.
राजू नारायण नारनवरे (५०), सुभाष झिटू चाचेरे (७०), चैतराम गोदरू चाचेरे (३६) व विलास कुसन कागदे (५०) सर्व रा. चांदोरी अशी शनिवारी रात्री अटक केलेल्यां आरोपितांची नावे आहेत. तर दुपारच्या सुमारास दिलीप नारायण नारनवरे (५५) रा. चांदोरी याला अटक करण्यात आली होती. भंडारा तालुक्यातील पलाडी गावाजवळ वाघाचा झालेला मृत्यू हा वीजप्रवाहित तारांच्या स्पर्शाने झाल्याचे शवविच्छेदन अहवालातही स्पष्ट झाले होते.
कोका वन्यजीव अभयारण्यालगत शुक्रवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास रुद्रा बी-२ या वाघाचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. वनविभागाने तात्काळ विविध पथकांच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेणे सुरू केले होते. गोपनीय माहितीवरून अवध्या २४ तासातच एकाला पकडण्यातही आले. यावेळी वन विभागाने माहिती देणाऱ्याला २५ हजारांचे बक्षीसही जाहीर केले होते.
चांदोरी (मालीपार)येथील दिलीप नारनवरे याची चौकशी केली असता त्याने वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी लावलेल्या वीजप्रवाहित तारांमुळे वाघाचा मृत्यू झाला व हे फासे आपणच लावल्याचे वनविभागापुढे कबूल केले. यावेळी त्याच्या साथीदारांचाही शोध घेण्यात आला. याप्रकरणी वनविभागाने तारांचे बंडल आणि लाकडी खुंट्या जप्त केल्या आहेत.