देवानंद नंदेश्वर
भंडारा : धावत्या चारचाकी वाहनावर राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला असणारे झाड कोसळले, अचानक घडलेल्या या घटनेत ४ जण जखमी झाले असल्याची घटना शुक्रवारी दुपारी १ वाजता तुमसर तालुक्यातील रानेरा गावानजीक घडली. चारचाकी वाहनात बसलेले नागरिक मध्यप्रदेशातील बालाघाट येथील असल्याची माहिती मिळाली आहे. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. मात्र, चारचाकी वाहनाचे मोठे नुकसान झाले.
तुमसर - बपेरा राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची शृंखला सुरूच आहे. राज्यमार्गाला राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्यात आले. या मार्गाबाबत सध्या हा राज्य मार्ग की राष्ट्रीय महामार्ग अशा चर्चा सुरू आहेत. राष्ट्रीय महामार्गचे आशा मावळत्याना दिसत आहेत. असे असले तरी अरुंद असणाऱ्या या मार्गावर अनेकांनी जीव गमावला आहे. झुडपातून मार्ग मोकळा करण्याचे प्रयत्न केले जात नाही. यामुळे वाहनांचे धडक बसत आहेत.
शुक्रवारी दुपारी मध्यप्रदेशातील बालाघाट येथून चार जण वाहन क्रमांक एमपी २० झेड ए ८१३३ ने नागपूरकडे निघाले होते. दरम्यान, रनेरा गावाशेजारी असणाऱ्या मार्गावर अचानक धावत्या वाहनावर मार्गाच्या कडेला असणारे झाड कोसळले. यात वाहनात बसलेले चार जण या किरकोळ जखमी झाले आहेत. सुदैवाने जीवितहानी टळली. यावेळी परिसरातील नागरिक मदतीला धावून आल्याने जखमींना तत्काळ मदत मिळाली आहे. सहायक पोलिस निरीक्षक निलेश गोसावी यांनी घटनास्थळी भेट देऊन मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न केला आहे. अपघातानंतर मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.