चुल्हाड (सिहोरा) : सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पात गत तीन वर्षांपासून चार पंप नादुरुस्त असतानाही यंत्रणेची कृपादृष्टी निविदा कंत्राटदारावर आहे. वारंवार या एकाच कंत्राटदाराला पंपगृहाचे कंत्राट देण्यात येत आहे. नादुरुस्त पंपगृहाची नासधूस करण्यात आली आहे. प्रकल्प स्थळात केवळ पाच पंपांनी पाण्याचा उपसा सुरू असून जलाशयात पाण्याचा उपसा अडचणीत आलेला आहे.
बावणथडी नदीवर साकारण्यात आलेल्या महत्त्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पात सध्याचे चित्र ठाकठीक नसल्याची माहिती यंत्रणेला आहे. भाजपच्या रास्ता रोको आंदोलनात सोंड्याटोला सिंचन प्रकल्पातील पंपगृहाचा मुद्दा गाजविण्यात आलेला आहे. यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना पंपगृहाची माहिती आंदोलनकर्त्यांनी विचारली असता बोबडी वळल्याचे दिसून आले आहे. पंपगृहाची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी निविदा कंत्राटदार प्रकाश मेश्राम यांच्याकडे आहे. परंतु आंदोलनातून कंत्राटदार बेपत्ता होते. प्रकल्प स्थळात नऊ पंप पाण्याचा उपसा करण्यासाठी आहेत. परंतु कधी पूर्ण पंपाने पाण्याचा उपसा करण्यात आला नाही. अनेक पंपांचे साहित्य उपलब्ध नाहीत. बेजबाबदार कंत्राटदाराने पंपाची नासधूस केली आहे. यात यंत्रणेचे अधिनस्त अधिकारी जबाबदार आहेत. पंप दुरुस्त नसतानाही कंत्राटदाराला बिल अदा केले जात आहेत. लाखोंचे बिल अदा करताना साधी पंपाची चौकशी करण्यात येत नाही. दरम्यान, प्रकल्प स्थळात फक्त पाच पंप सुरू आहेत. यामुळे नदीपात्रातून पाण्याचा उपसा करताना अडचणीचा सामना करावा लागत आहे. महिनाभरापासून पाण्याचा उपसा सुरू असताना चांदपूर जलाशयात २५ फूट पाण्याची साठवणूक करण्यात आली आहे. जलाशयाची क्षमता ३६ फूट पाणी साठवणूक करण्याची आहे. जलाशय रिकामे असताना उन्हाळी पिकांना पाणी वाटप अडचणीत येणार आहे. पावसाने दडी मारल्याने चांदपूर जलाशयाचे पाणी सोडण्याची ओरड सुरू झाली आहे. या परिसरात पावसाचे प्रमाण कमीच आहे. खरीप हंगामातील धान पिकाला पाणी वाटप करताना जलाशयात पाणी शिल्लक राहणार नाही.
बॉक्स
टाकीत गाळ व पंपात लाकडी ओंडके
पंपगृहाला नदीपात्रातून पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीत गाळ जमा झाला आहे. पाणी उपसा करणाऱ्या पंपात लाकडी ओंडके शिरले आहे. देखभाल व दुरुस्तीच्या नावावर कंत्राटदार शासकीय अनुदानाची लूट करीत आहेत. त्यांनी कधी पंपाची ऑइलिंग व ग्रीसिंग केली नाही. यामुळे वारंवार पंपगृहात बिघाड होत आहे. शासनाची दिशाभूल कंत्राटदार करीत असल्याने जलद गतीने पाण्याचा उपसा होत नाही.
कोट
सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाच्या पाण्यावर शेतकऱ्यांचे खरीप व उन्हाळी धानाचे पीक आहे. परंतु कधी पंप दुरुस्त करण्यात येत नाही. शासन अनुदान राशी कंत्राटदाराला देत असताना घशात घालत आहे. तीन वर्षांपासून पंप दुरुस्त होत नाही. बेजबाबदार कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करण्यात येत नसल्याने प्रकल्प स्थळात सोंड्याटोला बचावासाठी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे
मोतीलाल ठवकर, जिल्हाध्यक्ष, भारतीय किसान संघ