लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : युद्ध सुरू असलेल्या युक्रेनमध्ये अडकलेल्या भंडारा जिल्ह्यातील पाचही विद्यार्थी सुखरूप असून गुरुवारी चार विद्यार्थ्यांनी रोमानियातील राहत शिबिरात आश्रय घेतला असून एक विद्यार्थिनी भारतात परतल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. येत्या दोन दिवसात चारही विद्यार्थी सुखरूप घरी पोहचणार असल्याने पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. भंडारा जिल्ह्यातून वैद्यकीय शिक्षणासाठी पाच विद्यार्थी युक्रेनमध्ये गेले होते. त्यात मोहाडी तालुक्यातील वरठी येथील हर्षित चौधरी, तुमसर तालुक्यातील खापा येथील विनोद ठवकर, लाखनी येथील श्रेयश चंद्रशेखर निर्वाण, तुमसर येथील निकिता भोजवानी आणि भंडारा शहरातील प्रितीश गिरज पात्रे यांचा समावेश होता. रशिया-युक्रेन युद्धामुळे हे विद्यार्थी अडकले होते. त्यांना परत आणण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. इकडे पालकांचा जीव टांगणीला लागला. या विद्यार्थ्यांनी पायपीट करत कुणी पोलंडची तर कुणी रोमानियाची सीमा गाठली होती. गुरुवारी हरिष चौधरी बुडापेस्टच्या राहत शिबिरात असल्याचे सांगण्यात आले. तर रोमानियाच्या राहत शिबिरात विनोद ठवकर, श्रेयश निर्वाण आणि धीरज पात्रे यांनी आश्रय घेतला आहे. ऑपरेशन गंगाच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना भारतात आणले जाणार आहे. गत आठ दिवसांपासून पालक चिंतेत होते. मात्र गुरुवारी विविध शिबिरात विद्यार्थी सुखरूप असल्याची माहिती मिळाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.भंडारा जिल्ह्यातील पाच विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले असून त्यामधील एक विद्यार्थीनी भारतात परतली आहे. उर्वरित चार विद्यार्थी परतीच्या मार्गावर आहेत. मात्र आठ दिवसात त्यांनी युक्रेनमध्ये थरार अनुभवला. पालकही चिंतेत पडले होते. परंतु आता सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला.
निकिता पोहचली आईकडे रायपूरला
- तुमसरची निकिता भोजवानी ही तुमसरची असली तरी तुमसरला तिचे मामा राहतात. आई-वडील रायपूर येथे असतात. मामाने जिल्हा प्रशासनाला तिची माहिती देऊन मदत मागितली होती. त्यामुळे भंडारा जिल्हा प्रशासनाने निकिताला भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. रोमानियाच्या विमानतळावरून निकिता भोजवानी गुुरुवारी सकाळी दिल्ली मार्गे रायपूरला आपल्या आई-वडिलांकडे पोहचली. तिच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. - वरठी येथील सनफ्लॅग कंपनीतील महाव्यवस्थापक अरुणकुमार चौधरी यांचा मुलगा हर्षित सध्या बुडापेस्ट शहरातील शिबिरात आहे. शंभर विद्यार्थ्यांसोबत तो ३५ किलोमीटर अंतर पायी चालत पोलंडच्या सीमेवर शनिवारी पोहचला होता. तेव्हापासून तो पोलंडमध्ये येण्याच्या प्रयत्नात होता. अखेर पोलंड सीमेत त्याला प्रवेश मिळाला. सध्या तो बुडापेस्टच्या शिबिरात असून लवकरच तो भारतात येणार असल्याचे सांगण्यात आले.
मुलांच्या वाटेकडे पालकांचे डोळे- वैद्यकीय शिक्षणासाठी गेल्यानंतर युद्धसदृश परिस्थिती अडकलेले विद्यार्थी सुखरूप असल्याने पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्या वाटेकडे पालकांचे डोळे लागले आहे. कधी आपला मुलगा घरी येतो आणि त्याला पाहतो, असे आई-वडिलांना झाले आहे. युक्रेनमधून पोलंड आणि रोमानियाच्या सीमेपर्यंतचा थरार या विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना सांगितल्याने ते भयभीत झाले. आपली मुले सुरक्षित येतील की नाही यांची चिंता सतावत होती. आता मुले परत येत असल्याने पालक निश्चिंत झाले आहे.