महसूल विभागावर प्रश्नचिन्ह : अड्याळ पोलिसांची चार ट्रॅक्टरवर कारवाई
चिचाळ : जिल्ह्यात रेतीघाटाचे लिलाव झाले नसताना तहसील महसूल विभागाच्या कुंभकर्णी झोपेने रेतीची रात्रंदिवस चोरटी वाहतूक सुरू आहे. परिणामी, अड्याळ पोलिसांनी गस्तीदरम्यान रेतीने भरलेले चार ट्रॅक्टर जप्त केल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
जिल्ह्यात रेतीघाटाचे लिलाव झाले नसतानाही रेतीमाफियांनी महसूल विभागाला हाताशी धरून दबंगशाही वाढली आहे. अड्याळ पोलिसांनी पालोरा-कोंढा व किटाळी फाट्यावर स्वराज कंपनीचे चार बिना नंबर फलकाच्या अवैध रेती वाहतूक वाहनावर २० लक्ष १४ हजार रुपये मुद्देमालासह जप्तीची कारवाई केल्याने या दणकेबाज कारवाईमुळे रेती तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे. सोबतच त्यांना संरक्षण देणारे महसूल अधिकाऱ्यांना घाम फुटला आहे. पवनी तहसील महसूल प्रशासनाच्या संबंधातूनच अवैध रेतीची साठवणूक विविध भागात केली जात असल्याचे चित्र दिसून येत असताना महसूल प्रशासन कुंभकर्णी झोपेतच असल्याचे सोंग घेऊन असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. रेतीचोरीला आळा बसावा यासाठी प्रसारमाध्यमांनी बातम्या उचलून धरल्या, सोबत काही राजकीय पुढारीही यात कंबर कसून उतरले असतानादेखील ‘आमचे कुणी काही बिघडवू शकत नाही’ या आविर्भावात आहेत. शासनाचे कोट्यवधी रुपयाचे नुकसान होत आहे. याकडे शासनाने लक्ष देऊन रेती चोरट्यांवर कारवाई करावी, अशी मागणी तूर्तास सर्वत्र होत आहे.
कोट बॉक्स
पालोरा-कोंढा मार्गावर चार ट्रॅक्टर बिना नंबर प्लेट रेतीची अवैध वाहतूक करताना आढळले. त्यांना मुद्देमालासह अड्याळ पोलीस स्टेशनला जप्त करून गुन्हा नोंद केला आहे.
सुशांत पाटील, पोलीस निरीक्षक, अड्याळ.
बॉक्स
अन् तहसीलदारांना फटकारले
पवनी तालुक्यातील १३ रेतीघाटावर तहसील महसूल विभागाच्या आशीर्वादाने रेतीतस्करीने उच्चांक गाठला आहे. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी पवनी येथे तहसील कार्यालयासमोर बसलेल्या आंदोलन मंडपाला भेट दिली. त्यादरम्यान तहसीलदार नीलिमा रंगारी यांना ‘आम्ही जनतेचे नोकर आहोत, रेतीमाफियाचे नाही’म्हणत तहसीलदाराला फटकारले.