दीड लाखांचा दंड वसूल : लाखांदूर महसूल विभागाची कारवाई लाखांदूर : तालुक्यातील नांदेड रेती घाटातून रेती वाहून नेणारे चार ट्रक विरली/बु. येथे रात्री महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडले. रात्री रेती वाहतूक करण्याची परवानगी नसल्याने त्यांचेवर दीड लाखांचा दंड आकारण्यात आला. २५ आॅगस्ट पासून अनेक ट्रक तहसिल कार्यालयात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विभागाच्या कार्यवाहीसाठी अडून आहेत.वैनगंगा व चूलबंद नदीवरील रेती घाटांमुळे तालुक्याला आर्थिक लाभ होत असला तरी अंतर्गत रस्ते पुर्णत: रेतीच्या ओव्हरलोड ट्रकांमुळे खड्डेमय झाले आहेत. यामुळे चौरास भागातील बसेस बंद झालीत. नांदेड रेतीघाटावरुन अहोरात्र, रेतीचा उपसा करुन वाहतूक केल्या जात असल्याच्या तक्रारी तहसिल कार्यालयात प्राप्त झाली. त्या आधारावरुन विरली/बु. येथे महसूल विभागाचे व पोलिस विभागाच्या भरारी पथकाने चार ट्रक रात्रीदम्यान पकडले. यातील एम.एच.४० वाय ९२३७, एम.एच. ४० वाय ९२३६, एम.एच. ४० वाय ९८९१, एम.एच. ४० एन ७६६५ असे ट्रक क्रमांक आहे. तीन ट्रकमधील ५ ब्रास रेती प्रमाणे प्रती ट्रक ३९,५०० रुपये अवैधरीत्या वाहतूक केलेल्या खनिजाचे अधिकार शुल्कासोबत दंड आकारण्यात आला. याप्रमाणे तब्बल चारही ट्रक मालकांकडून दिड लाखांचा दंड वसूल करण्यात आला. सध्या ट्रक तहसील कार्यालयात जमा असून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी भंडारा कार्यालयाची कार्यवाहीकरिता प्रतीक्षेत आहेत. (तालुका प्रतिनिधी)
रात्रीला पकडले रेतीची वाहतूक करणारे चार ट्रक
By admin | Published: September 07, 2015 12:49 AM