गोबरवाही येथील घटना : मध्य प्रदेशातील चोरट्यांची टोळीतुमसर : वाहन दुरूस्ती दुकानासमोर उभ्या दोन चारचाकी वाहनाचे आठ टायर चोरट्यांनी लंपास केले. दुसरी एक चारचाकी घेऊन चोरटे पसार झाले. ही चारचाकी मध्यप्रदेशातील बोनकट्टाजवळ सायाबोडी गावाजवळ आढळून आली. या चारचाकीचे पाच टायर घेऊन चोरटे पसार झाले. ही घटना गोबरवाही येथे शनिवारी रात्री घडली. या प्रकरणात चोरट्यांचा सुगावा लागला नसून चोरट्यांची टोळी मध्यप्रदेशातील असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गोबरवाही येथे एकाच रात्री महिंद्रा मॅक्स व एका दुसऱ्या कारचे आठ टायर चोरीला गेल्याची घटना घडली. परसराम चिंचुरकर यांच्या कारचे टायर, जगदीश गभणे यांच्या मॅक्स दोन टायर, खान इंजिनिअरिंग येथे दुरुस्तीकरिता आलेल्या दुसऱ्या मॅक्स गाडीचा एक टायर व शेरू सैय्यद यांची मॅक्स गाडी चोरट्यांनी लंपास केली. चोरी झालेले वाहन मध्यप्रदेशातील बोनकट्टाजवळील सादाबोडी या गावाजवळ आढळून आली. परंतु मॅक्स वाहनाचे स्टेपनीसह चारही टायर काढून चोरटे पसार झाले आहेत. गोबरवाही येथे स्वतंत्र पोलीस ठाणे आहे. आजपर्यंत या परिसरात अशी चोरीची घटना घडलेली नाही. चोरटे टायर काढून मध्यप्रदेशाकडे पळून गेले. एक चारचाकी घेऊन चोरटे पसार झाले. येथे आंतरराज्यीय महामार्गाच्या सीमा मोकळ्या आहेत. नवीन वर्षाच्या निमित्ताने सीमा सील करण्याचा दावा पोलीस प्रशासनाने केला होता. नवीन वर्षात चोरटे येथे पुन्हा सक्रीय झाले आहेत.वनविभागाच्या तपासणी नाका नाकाडोंगरी येथे आहे. याठिकाणी कायमस्वरुपी पोलीस चौकी असणे गरजेचे आहे. सीमा उघड्या असल्यामुळे आंतरराज्यीय चोरट्यांचे येथे फावत आहे. निदान आंतरराज्यीय सीमेवर पोलीस चौकशी (तपासणी) केंद्र तथा पथक नियुक्त करण्याची गरज आहे. चोरट्यांचा अद्याप सुगावा लागलेला नाही. या घटनेमुळे गोबरवाही परिसरातील नागरिकात भीतीचे वातावरण आहे. या चोरट्यांच्या मागावर तुमसर पोलीस आहेत. (तालुका प्रतिनिधी)
चारचाकीचे टायर, वाहन चोरट्यांनी पळविले
By admin | Published: January 05, 2016 12:32 AM