भंडारा : राज्य शासनाच्या आदेशानुसार इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालाची कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, तुमसर तालुक्यातील माध्यमिक शाळेतील शिक्षक व कर्मचारी यांची सेवा तालुक्याचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांनी अधिगृहीत करून शिक्षक लसीकरण केंद्र, कोविड सेंटर, जिल्ह्यातील चेकपोस्ट येथे मागील काही महिन्यांपासून सेवा देत आहेत. त्यामुळे दिलेल्या मुदतीत निकालाची कामे कशी करावी, असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे. त्यामुळे माध्यमिक शिक्षकांना कोरोना सेवेतून मुक्त करण्यासाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने तहसीलदार यांना निवेदन दिले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या आदेशानुसार ९वी ते १२वी वर्गाचे निकाल तयार करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. ११ ते २१ जूनदरम्यान निकाल सर्व विषय शिक्षक, वर्गशिक्षक, शाळांचे मुख्याध्यापक यांना समिती स्थापन करून अचूक निकाल बोर्डाच्या संकेतस्थळावर अपलोड करावयाचा आहे. याबाबत कर्तव्यात कसूर केल्यास मंडळाने शाळा व शिक्षक यांच्यावर कारवाई करण्याचे सुचित केले आहे. त्यामुळे शिक्षक संभ्रमात पडला आहे. कोविड सेवा न केल्यास तहसीलदार, तर निकाल तयार करण्यास विलंब झाल्यावर मंडळ कारवाई करेल, या व्दिधा मनस्थितीत शिक्षक अडकला आहे. त्यामुळे विद्यार्थी हित लक्षात घेऊन माध्यमिक शाळेतील शिक्षकांना कोविड सेवेतून कार्यमुक्त करावे, असे विमाशि संघांच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देतेवेळी तुमसर तालुक्याचे कार्यवाह अ. भ. जायभाये, जिल्हा संघटन सचिव पंजाब राठोड, जिल्हा उपाध्यक्ष डे सर, रोहीत मरस्कोल्हे, जे. बी. कडव, भारत राठोड, विजय धुर्वे इत्यादी उपस्थित होते.