सार्वजनिक वाचनालयात कार्यक़्रम : भालचंद्र मुणगेकर यांचे प्रतिपादनभंडारा : ज्यांना समानता नको होती त्यांनीच षडयंत्राने बुद्धाचा धम्म नष्ट करून विषमता निर्माण केली. शेकडो वर्षाच्या विकृत मुल्यव्यवस्थेमुळे अत्याचाराविषयी संवेदनाही जाती-जातीय विभागली गेली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाच्या मध्यम मार्गाने धम्मक्रांती करून केले आहे. मानसिक गुलामगिरीतून मुक्त झालो, याचे आत्मभान होऊन स्वाभिमानाने जीवन जगणे ही धर्मांतराची सर्वात मोठी फलश्रुती आहे, असे मौलिक विचार प्रसिद्ध अर्थतज्ञ, विचारवंत व भारत सरकारच्या नियोजन आयोग व राज्यसभेचे माजी सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केले. ते धम्मचक्र प्रवर्तन एक दृष्टीक्षेप या विषयावर सार्वजनिक वाचनालयात आयोजित कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.अध्यक्षस्थानी महाराष्ट्र आॅफिसर्स फोरमचे अध्यक्ष राजरत्न कुंभारे होते. विचारमंचावर अमृत बन्सोड, डी.एफ. कोचे, महेंद्र गडकरी, महादेव मेश्राम, रूपचंद रामटेके, प्रभाकर भोयर, जिया पटेल यांची उपस्थिती होती. मुणगेकर म्हणाले की, अन्यायाच्या विरोधात बंड करणे ही न्यायाची सुरूवात असते. हे कार्लाईलचे तत्वज्ञान बाबासाहेबांनी सत्याग्रहाच्या माध्यमातून सिद्ध केले. देशात कठोर जातीयतेचे युग सुरू झाले. परंतु इतकी अमानुष व भयावह जातीव्यवस्था असतानाही भारतात क्रांती झाली नाही. जाती व्यवस्था आणि अस्पृश्यतेने सत्ता, संपत्ती व प्रतिष्ठेचे भयावह विषम वाटप केले. या धर्मांतरानंतर नवीन संस्कार, नवीन मूल्य आणि नवीन संस्कृती निर्माण झाली. मागील हजार दीड हजार वर्षातील भारताच्या एकूणच समाज रचनेच्या पार्श्वभूमिवर विचार केला तर भारताची राज्यघटना म्हणजे अनेक अर्थाने भारतात झालेली उदारमतवादी क्रांतीच आहे. आपण सर्वांनी कोपर्डी घटनेचा निषेध करून मराठ्यांना आरक्षण देण्याच्या मागणीचे समर्थन करावे.समाजात, आपण जे पाहिलं नाही त्यावर जास्त विश्वास आणि जे प्रत्यक्षात पाहिले त्यावर कमी विश्वास अशी प्रवृत्ती आहे. जाती व्यवस्था नष्ट झाल्यास आरक्षणही नष्ट होईल. अॅट्रासिटी कायदा रद्द करण्याची मुळीच गरज नाही. ते संरक्षण कवच आहे. अॅट्रासिटी कायदा असताना इतके मोठे गुन्हे घडतात तर नसताना किती गुन्हे घडतील, अनुसूचित जातींना १९५० पूर्वीचे पुरावे मागणारा जात पडताळणीचा जाचक अटी असलेला कायदा रद्द झाला पाहिजे आदी विषयावरही परखड विचार मांडले. यावेळी त्यांचा शाल,श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी अमृत बन्सोड, डी.एफ. कोचे, महेंद्र गडकरी, महादेव मेश्राम, रूपचंद रामटेके, प्रभाकर भोयर, गुलशन गजभिये, संजय बन्सोड, असित बागडे, आहुजा डोंगरे, डॉ. के.एल. देशपांडे, प्रा. मोरेश्वर गेडाम, आनंद गजभिये, आदिनाथ नागदेवे, अरुण अंबादे, एम. डब्ल्यु. दहिवले, गौतम कावळे, मायाताई उके, सीमाताई बन्सोड, लता करवाडे, पुष्पाताई मेश्राम, डॉ. भैय्यालाल गजभिये, वर्षाताई गोस्वामी, शकुंतला गजभिये आदींनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)
मानसिक गुलामगिरीतून मुक्तता ही धर्मांतराची फलश्रुती
By admin | Published: October 21, 2016 12:40 AM