भंडारा जिल्ह्यात असलेल्या १६० हॉटेलात पदार्थ तळण्यासाठी वारंवार तेच तेल वापरले जात असेल तर अशा हॉटेल चालकांवर आता अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई होणे अटळ आहे. हॉटेलात तळीव पदार्थांसाठी वापरणारे तेल वारंवार वापरले जाते. ते तेल २५ पोलार युनिटच्या वर वापरू नये, अशा सूचना असतानाही हॉटेल चालकांकडून काळेकुट्ट तेल होईपर्यंत वापरले जाते. या तेलातून तळलेले पदार्थ सेवन केल्यास ग्राहकांना कर्करोगासारख्या आजाराला सामोरा जावे लागू शकते. ‘रियूज कुकिंग ऑईल’ वापरणाऱ्यांवर मात्र आतापर्यंत एकही कारवाई झाली नाही. गोंदिया शहरात अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी तपासणी केली. परंतु या तपासणीत काहीच निष्पन्न झाले नाही. या अधिकाऱ्यांनी अचानक धाड घातल्यास मोठ्या प्रमाणात होत असलेले रियूज तेल अधिकाऱ्यांना सापडेल. मात्र आरोग्याला हानीकारक असलेल्यांवर कारवाई शून्य आहे.
फूटपाथवरील पदार्थ न खाल्लेले बरे...
फूटपाथवर असलेल्या हॉटेलात वापरण्यात येणारे तेल अनेकवेळा वापरले जाते. त्या तळलेल्या तेलातून पुन्हा पदार्थ सेवन केल्यास कर्करोग होऊ शकतो.
फूटपाथवर असलेल्या हॉटेलातील पदार्थांची पाहिजे तेवढी काळजी घेतली जात नाही. रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांची धूळ त्या पदार्थांवर बसते.
रस्त्याच्या कडेला असलेले तळलेले पदार्थ सेवन केल्यास अनेक आजाराला सामोरा जावे लागू शकते. त्या पदार्थांवर माशा बसतात. शिळे पदार्थही तळून विक्रीला ठेवलेले असतात.
तेलाचा पुनर्वापर आरोग्याला घातक
समोसा, कचोरी, भजे व तेलात तळले जाणारे इतर पदार्थ यासाठी वारंवार त्याच तेलाचा वापर होऊ नये, तेलाचा पोलार युनिट २५ पर्यंतच वापरण्याची परवानगी शासनाने दिली आहे. त्यापेक्षा जास्त तेल वापरले गेले तर त्या हॉटेल चालकांना कारवाईस सामोरा जावे लागणार आहे. परंतु भंडारा जिल्ह्यातील अनेक हॉटेलात रियूज तेल वापरले जाते. ते आरोग्याला घातक आहे.
डॉक्टरांचा सल्ला
शक्यतो बाहेरचे खाणे टाळावे, घरातील पदार्थ शुद्ध असतात. स्वत: बनविलेल्या पदार्थांची खात्री १०० टक्के असते. बाहेरचे खाल्ल्याने व्यक्तीला विविध आजारांना बळी पडावे लागू शकते.
- डॉ. यशवंत लांजेवार, बालरोगतज्ज्ञ, भंडारा
बाहेरचे खाल्ल्याने ते पदार्थ शिळे आहे किंवा वारंवार त्याच तेलातून तळून ठेवण्यात आले आहे हे कुणाला ठाऊक नसते. अनेक लोक पैशाच्या हव्यासापायी आरोग्याची पर्वा न करता ग्राहकांशी खेळ करीत आहेत. त्यामुळे शक्यतो घरातीलच खावे.
- डॉ. प्रफुल नंदेश्वर, भंडारा
हॉटेल व फरसाण दुकाने चालकांनी वारंवार तेच तेल वापरू नये, अन्यथा त्यांना कारवाईला सामोरा जावे लागेल. ज्या हॉटेलात ५० लिटरपेक्षा अधिक तेलाची गरज पडते, अशा हॉटेलांतील तपासण्या आधी करण्यात येत आहेत. नियम तोडल्यास कारवाईस सामोरा जावे लागेल.
- अभय देशपांडे, सहायक आयुक्त, अन्न व प्रशासन विभाग, भंडारा.