गोंदिया : उत्तर प्रदेशच्या नेवादा येथील निरंजन भारती व अमन कुमार भारती यांच्या डोक्यावर काठीने मारून पसार झालेला त्यांचा सहकारी मजूर बलवान सौरभ जयस्वाल ऊर्फ रॉय (वय ४०, रा. रतनपुरा, अर्जुन वॉल्टरगंज, जिल्हा बस्ती, उत्तर प्रदेश) याला गोंदिया शहर पोलिसांनी १ जुलै रोजी गुजरातच्या सुरत येथून अटक केली आहे. गोंदियाच्या सिंधी कॉलनी, रावण मैदान येथे रा. नंदलाल गोपलानी यांच्या घराचे बांधकाम सुरू होते. त्या घराचे दगड घासण्याचे काम करण्यासाठी उत्तर प्रदेशातील चार मजूर आले होते. ते चारही लोक एकत्र राहत असून, ज्या ठिकाणी काम सुरू होते, त्याच ठिकाणी ते राहत होते. मृत निरंजन भारती, अमन कुमार भारती, आरोपी बलवान व खेमन कपिलदेव यादव हे चौघेही एकत्र स्वयंपाक करून राहत असत. बलवान आणि मृत निरंजन हे एका खोलीत झोपायचे, तर खेमन यादव हे छतावरील बाजूला असलेल्या खोलीत आराम करायचे. २४ जूनच्या रात्री नऊ वाजता चौघेही एकत्र जेवण करून नेहमीप्रमाणे आपल्या खोलीत आराम करायला गेले. बलवान क्षुल्लक कारणावरून वाद करायचा. या क्षुल्लक वादातूनच त्याने निरंजन व अमनकुमार यांच्या डोक्यावर काठीने प्रहार करून त्या दोघांचा खून करून पसार झाला होता. गोंदिया शहर व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपी बलवान श्रीनिवास राजभर ऊर्फ रॉय (वय ३६) याला अटक केली आहे. आरोपीने गुन्हा केल्याचे कबूल केले. १ जुलै रोजी सायंकाळी ५.४८ वाजता आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याला उद्या, सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक बनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली गोंदिया शहराचे ठाणेदार पोलीस निरीक्षक महेश बनसोडे, सहायक पोलीस निरीक्षक अभिजित भुजबळ, सागर पाटील, संतोष सपाटे, सहायक फौजदार धनश्याम थेर यांनी केली.
दुहेरी खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2021 4:22 AM