आस्थेचे केंद्रस्थान असणाऱ्या चांदपूर येथील जागृत हनुमान देवस्थानच्या विकास कार्यासाठी खासदार प्रफुल्ल पटेल प्रयत्नशील आहेत. जिल्हा नियोजन समितीकडे ‘क’ वर्ग पर्यटन स्थळाच्या विकास कार्यासाठी निधी व प्रस्तावित कामांना मंजुरी प्रदान करण्यासाठी कामे प्रस्तावित केली आहेत. या कामांना पर्यटन विकास योजनेअंतर्गत मंजुरी देण्याची मागणीही त्यांनी केली आहे. चांदपूर येथील जागृत हनुमान देवस्थानात लाखो भाविकांची दर्शनासाठी हजेरी असते. तीर्थस्थळ व पर्यटन असे चित्र या परिसरात असल्याचे दिसून येत आहे.
खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या प्रयत्नांमुळे दीड कोटींची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. देवस्थानात सिमेंट रस्ता बांधकामासाठी ३५ लाख, सभागृह बांधकामासाठी २० लाख आणि आवारभिंत १५ लाख रुपयांचा निधी नियोजित करण्यात आला आहे. देवस्थानात किचन शेड २० लाख, पायऱ्यावरील शेडकरिता ३० लाख रुपयांच्या निधीचे नियोजन आहे. देवस्थान परिसराच्या सौंदर्याकरिता भाविक व ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांची जुनी मागणी होती. सौंदर्यकरणासाठी २० लाख रुपयांचा निधी मंजुरीकरिता प्रस्तावित करण्यात आला आहे. देवस्थानच्या विकासासाठी १ कोटी ४० लाख रुपयांची कामे प्रस्तावित करण्यात आल्याने लॉटरीच लागणार आहे. भाविकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करण्यासाठी ट्रस्ट सातत्याने प्रयत्न करीत आहे.
बॉक्स
पर्यटन स्थळ उपेक्षितच
ग्रीन व्हॅली चांदपूर पर्यटन स्थळाला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळअंतर्गत मंजुरी देण्यात आली आहे. महामंडळाची व्याप्ती मोठी असून, विकास कामे मात्र रेंगाळली आहेत. विश्रामगृह बांधकामानंतर नवीन कामे आली नाहीत. माजी आमदार चरण वाघमारे यांनी विश्रामगृह खेचून होते. परंतु नंतर ब्रेक लागले आहेत. महामंडळाचे नाव मोठे, दर्शन खोटे असे चित्र निर्माण झाले आहे. पर्यटन स्थळात विकास आटला आहे. संजीवनी बुटी देण्याचे प्रयत्न झाले पाहिजे. कोरोनामुळे निधी लांबणीवर घालण्यासाठी आयते कोलित मिळाले आहे. पर्यटन स्थळाला कधी विकसित केले जाईल, कुणी सांगायला तयार नाहीत. राज्यसभेचे खासदार प्रफुल पटेल यांच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत.