रबी हंगामात विकलेल्या धानाचे चुकारे शेतकऱ्यांना मिळाले नव्हते. भंडारा जिल्ह्यात १८ लाख ३९ हजार क्विंटल धानाचे २२८ काेटी रुपयांचे चुकारे थकीत हाेते. यामुळे शेतकरी माेठ्या अडचणीत आले हाेते. शेतकऱ्यांची ही काेंडी लक्षात घेता खासदार प्रफुल पटेल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर शासनाने चुकाऱ्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा कमी दर मिळू नये म्हणून जिल्हा पणन विभागाच्यावतीने धानाची खरेदी करण्यात येते. शेतकऱ्यांनी माेठ्या प्रमाणात धानाची विक्री केली. परंतु चुकारे थकीत हाेते. यामुळे शेतकऱ्यात असंताेष निर्माण झाला हाेता. शेतकऱ्यांना सावकाराच्या दारात उभे राहण्याची वेळ आली हाेती. रकम मिळावी म्हणून खासदार प्रफुल पटेल यांच्या माध्यमातून माजी आमदार राजेंद्र जैन, आमदार राजू कारेमाेरे, आमदार मनाेहर चंद्रिकापुरे यांनी पाठपुरावा केला. त्याचीच दखल घेत शुक्रवारी अन्न व नागरी पुरवठा विभागाने रबी हंगामातील धानाच्या चुकाऱ्यांसाठी ४१८ काेटी ६५ लाखांचा निधी मंजूर केला आहे. हा निधी मार्केटिंग फेडरेशनकडे वर्ग करण्यात आला आहे.
बाॅक्स
साेमवारपासून मिळणार चुकारे
अन्न व पुरवठा विभागाने ४१८ काेटी ६५ लाख रुपयांचा निधी चुकाऱ्यांसाठी मंजूर केला आहे. हा निधी पणन महासंघाला उपलब्ध झाला असून ताे साेमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा हाेणार आहे. याबाबतचे आदेश अन्न व नागरी पुरवठा विभागाचे वित्तीय सल्लागार व उपसचिव अभय धांडे यांनी निर्गमित केले आहे.