लोकमतच्या प्रयत्नाला यश : ४२ लाख रुपयांच्या निधीतून बाजारपेठेचे भूमिपूजन दिघोरी (मोठी) : नागरी सुविधा विकास योजनेअंतर्गत दिघोरी मोठी येथे आठवडी बाजार भरत असलेल्या ठिकाणी बाजारपेठ विकास कामाला ५२ लाख रुपयाचा निधी मंजूर झाला. त्या अनुषंगाने सदर कामांचे भूमिपूजन करण्यात आले.मागील अनेक वर्षापासून दिघोरी (मोठी) येथील आठवडी बाजार ज्या जागेत भरत होता ती जागा ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर आहे, असे असताना सुद्धा ही जागा कधीच स्वच्छ राहत नव्हती. या जागेत घाण पसरली होती. जागेच्या चहूबाजूला खातकुडे तर कुठे कचरा टाकला जात होता. यासाठी ‘लोकमत’ने पाठपुरावा करून या प्रकरणाला वाचा फोडली. त्या अनुषंगे येथील जिल्हा परिषद सदस्य व्यंकट मेश्राम यांनी सदर जागेचा कायापालट करण्याचा प्रयत्न सन २०१३ मध्ये केला. मात्र तत्कालीन ग्रामपंचायत कमेटीने त्यांचे प्रयत्न हाणून पाडले व ठराव देण्यासाठी नकार दिला. त्यामुळे मेश्राम यांनी ११ नोव्हेंबर २०१३ रोजी उपोषण केले. त्याचाही लाभ झाला नाही. नव्याने नियुक्त झालेल्या ग्रामपंचायतने जिल्हा परिषद सदस्य व्यंकट मेश्राम यांनी बाजारपेठ विकासाची योजना समजावून सांगितले. बाजारपेठेतील जागेच्या अव्यवस्थेबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून वारंवार पाठपुरावा केला होता. त्यामुळे या ग्रामपंचायत कमेटीने ठराव देऊन सदर विकास योजना राबविण्यासाठी ठराव घेतला. नागरी विकास सुविधा योजनेअंतर्गत बाजारपेठ विकास कामाला एकूण ४२ लाख रुपयाचा निधी जिल्हा परिषदेकडे मंजूर करून दिले आहे. त्याअनुषंगाने ओटे बांधकाम, ग्राऊंड फ्लोअरिंग, बाजारपेठ रस्ते, विजेची व्यवस्था व पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य व्यंकट मेश्राम यांनी केले. यावेळी जासवंत नंदेश्वर, शंकर खराबे, टिकाराम देशमुख, टी.एम. कोरे, भीमराव देशुख, लाला करंजेकर, ओम करंजेकर, मनोहर हटवार, बाबूराव धकाते, वसंता हटवार उपस्थित होते. (वार्ताहर)
दिघोरीत बाजारपेठेसाठी निधी मंजूर
By admin | Published: February 05, 2015 11:05 PM