प्रा. बहेकार यांनी बालपणापासूनच संतांचे विचार अंगीकारीत समाजसेवेचे व्रत स्वीकारलेले होते. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतही उच्च शिक्षण घेत स्वतः परिवाराची व गावकऱ्यांची सुद्धा त्यांनी तत्परतेने सेवा केली होती. राहत्या गावी अंधश्रद्धेचे खूप मोठे प्रस्थ होते. अंधश्रद्धेच्या नावाने कित्येक गोरगरिबांची आर्थिक लूट होत होती. प्रा. बहेकार यांनी गावात स्वतः अंनिसच्या पुढाकारातून शिबिरे लावीत गावकऱ्यांना वैज्ञानिक धडे दिले होते. अंधश्रद्धेच्या जोखडातून गावकऱ्यांना मुक्तता करीत विज्ञाननिष्ठ जीवनाची दिशा दिली होती.
तालुकास्तरावरील ग्रीन फ्रेंड्सचे ते सदस्य असून, निसर्गाचे रक्षक होते. पर्यावरणप्रेमीत त्यांचे नाव अग्रक्रमांकावर होते. नेफडोचे नागपूर विभागीय सचिव सुद्धा होते. तल्लख बुद्धीचे समाजाला प्रेरणादायी जीवन जगणारे व गरिबीची जाण ठेवून हसत मुख प्रा. बहेकार समाजासाठी खरेखुरे आदर्श ठरले. पालांदूर येथे त्यांनी विविध वैज्ञानिक प्रयोग सादर करीत विद्यार्थी वर्गांच्या मनातील अंधश्रद्धेची भीती दूर केली होती. लाखनी तालुक्यातील पालांदूर शेजारील ढिवरखेडा येथे अपघाती निधनाची बातमी कळताच अख्खा गाव त्यांच्या घरी जमा झाला होता.