मोहाडी (भंडारा) : हरदोली झंझाड येथील गावात अंत्यसंस्कार सुरू असताना मधमाशांनी हल्ला केला. लोकांना मृतदेह सोडून जिवाच्या भीतीने बाहेर पळावे लागले. ही घटना मंगळवारी घडली. विशेष म्हणजे जिल्ह्यात महिनाभरात घडलेली ही तिसरी घटना आहे.
हरदोली झंझाड गावातील मोराती कबल गायधने यांचे वयाच्या ६९व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी नातेवाईक, गावकरी आणि मित्र परिवार आला होता. हरदोली येथील त्यांच्या घरापासून अंत्ययात्रा काढण्यात आली. गावाजवळील स्मशानभूमीत अंत्ययात्रा नेण्यात आली. अंत्यसंस्काराचा विधी सुरू झाला. सर्वजण शोकाकुल वातावरणात या विधीत सामील झाले होते. विधीनंतर मृतदेहाला अग्नी देण्यात आला. त्यामुळे धूर निर्माण झाला. इतक्यात अचानक मधमाशांनी हल्ला केला. मधमाशांचा हल्ला होताच अंत्ययात्रेला आलेले लोक भयभीत झाले आणि वाट मिळेल तिकडे पळायला लागले.
मृतदेह स्मशानभूमीतच सोडून सर्वजण पळाले. लोक सैरावैरा धावत होते. कुणी शेतात पळाले, तर कुणी गावाच्या दिशेने धावत होते. कुणी पाण्याच्या दिशेने पळाले. जीव वाचवण्यासाठी लोक नुसते धावत होते. अवघ्या मिनिटभरात स्मशानभूमीत शुकशुकाट पसरला. या धावपळीत अनेकजण पडले. मधमाशांचा हल्ल्यात १५ जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करून सुटी देण्यात आली.
अखेर पोळ काढला
मंगळवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेनंतर माजी सरपंच सदाशिव ढेंगे यांनी पुढे असा धोका टाळण्यासाठी तो पोळ गावातील व्यक्तींकडून काढून घेतला.