भंडारा येथील घटना : नगराध्यक्ष, नगरसेवक व तरूणांनी घेतला पुढाकार भंडारा : घरात अठराविश्व दारिद्रय. पतीचे छत्र हरपले. परमेश्वराने मुलालाही हिरावून नेले. तीन मुलींसोबत आयुष्याचा गाढा कसाबसा ओढत असताना तिनेही जगाचा निरोप घेतला. त्यानंतर मुलींवर अंत्यसंस्काराची जबाबदारी आली. परंतु, अंत्यसंस्कार करण्याइतपत त्यांच्याकडे पैसे नव्हते. ही माहिती कळताच नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुनील मेंढे, नगरसेवक संजय कुंभलकर, साधना त्रिवेदी, वनिता कुथे, रजनीश मिश्रा व स्थानिक तरूणांच्या मदतीने लोकवर्गणी गोळा करून त्या महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. रूखमाबाई खंडरे (६५) रा.भंडारा असे मृत महिलेचे नाव आहे. शहरातील राणी लक्ष्मीबाई वॉर्डातील बालपुरी मंदिर परिसरात ती राहत होती. काही वर्षांपुर्वी पती व मुलाचा मृत्यू झाला. तीन मुलींशिवाय तिला कुणीही नातेवाईक नाहीत. त्यांच्यासोबतच ती वास्तव्याने राहत होती. सोमवारला सकाळी अचानकपणे तिचा मृत्यू झाला. परंतु, दारिद्रयात खितपत असलेल्या तिच्या मुलींवर आईच्या अंत्यसंस्काराची वेळ आली. परंतु, जवळ पैसे नव्हते. तेव्हा स्थानिक तरुणांनी सामाजिक बांधिलकीतून लोकवर्गणी गोळा करणे सुरू केले. नगरसेवक संजय कुंभलकर, साधना त्रिवेदी, वनिता कुथे, रजनीश मिश्रा यांनी मदत केली. सोमवारला दुपारी १२ वाजता रूखमाबाई यांच्या पार्थिवावर वैनगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. तिच्या तिनही मुलींनी आईच्या अंत्यसंस्काराचे सोपस्कार पार पाडले. अंत्यसंस्काराच्यावेळी नगराध्यक्ष सुनील मेंढे, नगरसेवक रजनिश मिश्रा हे आवर्जून उपस्थित होते. या मदतकार्यात मुकेश राऊत, संदीप सार्वे, मंगेश पडोळे, अशोक चौधरी, संदीप मेश्राम, हेमंत खंडरे, सुधाकर मते, गोलू सार्वे, संजय सोनवाने यांनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)
लोकवर्गणीतून केले महिलेवर अंत्यसंस्कार
By admin | Published: January 31, 2017 1:17 AM