सध्या ग्रामीण भागातसुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला असून अनेकांचा मृत्यूसुद्धा झालेला आहे. आजही अनेक जण पाझिटिव्ह येत आहेत. रुग्णालयात बेड उपलब्ध नाहीत, जर बेड मिळाला तर ऑक्सिजन मिळत नाही तर कधी रेमडिसिविर इंजेक्शन मिळत नाही. एवढी भीषण समस्या असतानासुद्धा काही लोक नियमांचे पालन करताना दिसत नाहीत.
मंगळवारला बँक ऑफ इंडिया मोहाडी शाखेसमोर शेकडो ग्राहकांनी गर्दी केली होती. बँकेत एकावेळी फक्त तीन ते चार ग्राहकांना आत घेतल्या जात असल्याने आपला नंबर प्रथम लागावा म्हणून सर्वच जण बँकेच्या गेटजवळ उभे होते. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. एवढेच नाही तर अनेकांनी तोंडाला मास्कसुद्धा लावलेले नव्हते. काहींनी देखाव्याकरिता मास्क तोंडाखाली लावून ठेवले होते. या गर्दीत एखादा जरी कोरोना बाधित असेल तर त्याचे दुष्परिणाम अनेकांना भोगावे लागू शकतात, याचे भान कोणालाच नव्हते. बँकेनेसुद्धा यासाठी कोणतेच नियोजन केलेले दिसत नाही. पुढील वेळी तरी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा आहे.