करडी(पालोरा): सरपंचाचे आरक्षण निघण्यास अवधी असल्याने ग्रामपंचायत निवडणुकीनंतर होणारी पळवापळवी, घोडेबाजार तात्पुरता का होईना थांबलेला आहे. इच्छुक सदस्यांना सरपंचपदाचे स्वप्न बेचैन करीत असून रात्रीची झोप व दिवसाची चैन हरविली आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत वेगवेगळ्या स्वतंत्र व राजकीय पक्ष समर्थात पॅनल, आघाड्यांचे उमेदवार व स्वतंत्र उमेदवार विजयी झाले. समर्थकांनी जल्लोषात गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा केला. डीजे व डफलीच्या तालात मिरवणुका काढण्यात आल्या. परंतु सरपंच कोण, याचा पेच अजूनही कायम असल्याने सर्वच अचंबित आहेत. सरपंच पदाचे आरक्षण कुणासाठी, हे स्पष्ट न झाल्याने अनेक संभाव्य सरपंचांचा हिरमोड झाला आहे.
गावाचा सर्वांगीण विकासाची धुरा ग्रामपंचायतीवर पर्यायाने सरपंच व ग्राम कमेटीवर असते. गावकारभारी होण्यासाठी गावागावात समर्थक व आघाड्यांच्या विजयासाठी, ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळविण्यासाठी यंदा प्रचंड उत्साह दाखविण्यात आला. पक्षांची साथ मिळाल्याने कार्यकर्तेही जोशात होते. स्वतः व पक्षासाठी अहोरात्र मेहनत घेऊन विजयश्री खेचून आणत अनेकांनी स्वत:ला सिद्ध करून दाखविले. परंतु यावर्षी मागील थेट सरपंच निवडीच्या धोरणात बदल करीत सदस्यांमधून सरपंच निवडण्याचे जुनेच धोरण राज्य शासनाने स्वीकारले आहे. त्या धोरणाचा भाग
म्हणून प्रथम सदस्यांची निवड व त्यानंतर आरक्षण सोडत आणि सरपंच निवडणूक होणार असल्याने अनेकांचा जीव भांड्यात पडला आहे.
-----
निवडणुकीचा खर्च लाखात
यावर्षीच्या निवडणुका अधिक खर्चिक झाल्याचे खुद्द निवडून आलेले सदस्यच खाजगीत सांगत आहेत. एकेका मतासाठी हजारों रुपयांचा चुराडा झाला. जिद्द व इर्षा पेटलेल्या राजकारणात सत्ता मिळविण्यासाठी व निवडून येण्यासाठी पाण्यासारखा खर्च करण्यात आला. निवडणूक आयोगाने निर्धारीत केलेली खर्च मर्यादा प्रत्येक गावात ओलांडली गेली. परंतु हा खर्च अघोषित असल्याने निवडणूक विभागाला या खर्चाला हिशेख कुणीही देणार नाही. अनेक सदस्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दीड ते दोन लाख रुपये खर्च झाल्याचे सांगितले.
----
कारणांच्या शोधात हरलेले उमेदवार
ग्रामपंचायत निवडणुका अतिशय चुरशीच्या व काट्याच्या झाल्या. अनेक उमेदवार अवघ्या एका मताने तर अनेक तीन ते सात मतांच्या फरकात हरले. घराजवळच विरोधक व समर्थक असल्याने हरलेले उमेदवार आता कारणांची मीमांसा करीत आहेत. कुणी मत दिले नाही, कुणी दिले, याचा हिशेब जुळविला जात आहे. कुणी दगाबाजी केली, मते दिली नाही, ती व्यक्ती समोर दिसताच, त्यांच्या रागाला पारावार नसतो. हरलेल्यांनी जवळच्या समर्थकांवर, नातेवाईकांवर आपला राग काढला, परंतु आता उपयोग काय, असा प्रश्न मनाशी विचारून अनेकांनी रागाचा पाणी केला असल्याचे खासगीत सांगितले जात आहे.