भंडारा : राज्य शासनाच्यावतीने इयत्ता १ ते ८वीच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वी मोफत पाठयपुस्तके देण्यात येतात. विदर्भातील चालू वर्षाचे शैक्षणिक सत्र २६ जूनपासून सुरु झाले. मात्र, विद्यार्थ्यांना अद्याप मोफत पाठ्यपुस्तके देण्यात आली नाहीत. त्यामुळे पुस्तकाविना विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात असल्याचा आरोप विमाशिचे सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांनी केला असून, विद्यार्थ्यांना तत्काळ मोफत पाठ्यपुस्तके उपलब्ध करून द्यावीत, या मागणीसाठी राज्याचे शिक्षणमंत्री व शिक्षण आयुक्त यांना निवेदन देण्यात आले.
राज्यातील जिल्हा परिषद, नगर पालिका, नगर परिषद, महानगर पालिका, दिव्यांग शाळा खासगी अनुदानित, विनाअनुदानित, अंशतः अनुदानित इत्यादी शाळांमधील इयत्ता १ ते ८वीच्या विद्यार्थ्यांना राज्य शासनामार्फत मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. मात्र, कोविड १९च्या प्रभावामुळे राज्यातील तसेच नागपूर विभागातील शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्यात आली नाहीत.
याशिवाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर विभागातील शाळांचे शैक्षणिक सत्र सुरु होऊन चार महिने झाले असून, पुस्तकाविना ऑनलाईन शाळा सुरु आहेत.
मात्र, शासनाकडून देण्यात येणारी मोफत पाठ्यपुस्तके अद्याप विद्यार्थ्यांना मिळाली नसून, जिल्हास्तरावरून मागील वर्षीची पाठ्यपुस्तके परत घेऊन नवीन विद्यार्थ्यांना देण्याच्या सूचना शाळांना देण्यात येत आहेत. मात्र, पन्नास टक्केही पुस्तके परत आली नाहीत. कोणाला पुस्तके द्यावी व कोणाला सोडावे. हा शाळांना पडलेला मोठा प्रश्न असून, पुस्तकांविना अभ्यास कसा करावा? हे विद्यार्थ्यांसमोर मोठे आव्हान आहे.
राज्य शासनाने इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना तातडीने मोफत पाठ्यपुस्तके देण्याच्या मागणीसाठी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री व शिक्षण आयुक्त यांना दि. १८ सप्टेंबर रोजी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघांचे सरकार्यवाह सुधाकर अडबाले, जिल्हाध्यक्ष सुधाकर देशमुख, कार्यवाह राजेश धुर्वे, चंद्रशेखर रहांगडाले, टेकचंद मारबते, भाऊराव वंजारी, पुरुषोत्तम लांजेवार, मनोज अंबादे, जागेश्वर मेश्राम, श्याम गावळ, पंजाब राठोड, अनंत जायभाये, मोरेश्वर वझाडे, भीष्म टेम्भुरने इत्यादीनी निवेदन देऊन मागणी केली आहे.
बॉक्स
बॉक्स
विद्यार्थी आणि पालक त्रस्त
यात अनेक विद्यार्थ्यांकडे मोबाईल, लॅपटॉप, संगणक, इंटरनेट नेट सेवा नसल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यास करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून, अनेक विद्यार्थी आजही अध्यापन प्रक्रियेपासून दूर आहेत. ऑनलाईन अभ्यासक्रम परिणामकारक नसल्याची पालकांची ओरड असून, ऑफलाईन अभ्यास करण्याकरिता विद्यार्थ्यांकडे आवश्यक पाठ्यपुस्तके नाहीत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक त्रस्त आहेत.
कोट बॉक्स
शासनाकडून देण्यात येणारी मोफत पाठ्यपुस्तके जिल्हास्तरावरून शाळानिहाय वितरीत करण्यासाठी वाहन भत्ता दिला जात असताना देखील प्रत्येक्ष शाळेत पुस्तके न पोहोचविता शाळांना केंद्रस्तरावर बोलावून स्वतः पुस्तके घेऊन जाण्याचे शाळांना आदेश दिले जाते. पुस्तके शाळेत पोहोचवून देणे ही शिक्षण विभागाची जबाबदारी आहे.
सुधाकर अडबाले,
सरकार्यवाह, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ.