अशोक पारधी।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : विदर्भातील अष्टविनायकात महत्वपूर्ण असलेला पवनी येथील पंचमुखी गणेश नवसाला पावणारा म्हणून ओळखला जातो. सातशे वर्ष प्राचीन या गणेशाच्या दर्शनासाठी गणेशोत्सवात भाविकांची प्रचंड गर्दी झालेली असते.विदर्भाची काशी म्हणून पवनीची ओळख आहे. या पवनीत शेकडो मंदिर आहेत. त्यातील विठ्ठल गुजरी वॉर्डातील गणेश मंदिर विदर्भातील अष्टविनायकापैकी एक होय. सातशे वर्ष प्राचीन या मंदिरातील गणेशाची पंचमुखी मूर्ती शमी वृक्षावर कोरलेली आहे. पवनी शहराचे इतिहास अभ्यासक प्राध्यापक नामदेव हटवार यांच्यामते मूर्तीची स्थापना अकराव्या शतकातील असून ही मूर्ती शिळेवर कोरली आहे. एका शिळास्तंभावर चारही बाजूला श्रीगणेशाच्या मूर्ती कोरल्या आहेत. पाचवी मूर्ती नैऋत्य दिशेला आहे. मूर्तीची उंची ३२ असून पूर्व पश्चिम लांबी १७ इंच आणि उत्तर दक्षिण रुंदी १५ इंच आहे. मूर्तीच्या हातात लाडू व परशू स्पष्ट दिसते. डोक्यावर मुकुट धारण केलेले आहे. नैऋत्य व पश्चिम दिशेच्या मूर्ती सरळ उभ्या असून सोंड सरळ आहे. मूर्तीच्या वरचा भाग ११ इंच निमूळता आणि मूर्ती जमिनीत दीड फूट खोल आहे.शेंदूर लावला असल्याने मूर्तीचे मुळ स्वरुप निट दिसत नाही. तरीपण मूर्ती अतिशय आकर्षक आहे. उत्तरामुखी गणेशाचे मंदिर असून समोरील भव्य खांब आहे. अनेक पर्यटक येथे नवसाला पावणाऱ्या गणेशाच्या दर्शनासाठी येतात. सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणाऱ्या गणेशाची पूजा अर्चा अरविंद भट यांच्या मार्गदर्शनात केली जाते. पूर्वी मंदिर कौलारू होते. या मंदिराचा जीर्णोद्धार अरविंद भट यांनी स्वखर्चाने केला आहे. भट घराण्याचे हे कुलदैवत आहे. जागृत देवस्थान असल्याने गणेशोत्सवात भाविकांची मोठी गर्दी असते.विठ्ठल गुजरी वॉर्डातील या गणेश मंदिरात वर्षभर भाविकांची दर्शनासाठी गर्दी दिसून येते. गणेश चतुर्थी आणि गणेशोत्सवाच्या काळात तर पाय ठेवायला जागा नसते. विदर्भासह परप्रांतातील भाविकही येथे दर्शनासाठी येतात. पंचमुखी गणेश मूर्तीची पूजा अर्चना करून देवाला साकडे घालतात. हा गणेश नवसाला पावणारा म्हणून ओळखला जात असल्याने अनेक जण आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी येतात तर ज्यांची मनोकामना पूर्ण झाली ती मंडळी नवस फेडण्यासाठी पवनी येथे येतात. गणेशोत्सवात यात्रेचे स्वरुप असते.
असे जाता येते पवनीलावैनगंगा नदीच्या पवित्र तीरावर पवनी शहर वसले आहे. हे शहर भंडारा शहरापासून ४५ किलोमीटर आणि नागपुरवरून ८४ किलोमीटर अंतरावर आहे. येथे जाण्यासाठी राज्य मार्ग असून खासगी वाहनानेही येथे पोहचता येते.