घरावरील छप्परे उडाली : मुलगी जखमी, कुटुंब उघड्यावर, ७० हजाराच्यावर नुकसान, पानटपरीधारकांना फटका, पिंपळगावात शाळेचे छत कोसळलेभंडारा : रविवारी सायंकाळी मेघ गर्जनेसह अचानक पावसाने हजेरी लावली. भंडारा शहरात सुमारे अर्धातास गारांसह पाऊस पडला. तर उर्वरित जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस बरसला. यात अनेक घरांवरील छत उडाली. तर अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती.जिल्ह्यातील अनेक तालुक्यात रात्री उशिरा पाऊस पडला. अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणीची वीज पुरवठा खंडीत झाला होता. पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील कापणीयोग्य पिकांचे नुकसान झाले आहे.पालांदूर : पालांदूर परिसरात ३४.६ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. सानगाव येथे सुसाट वाऱ्याने किशोर राऊत यांच्या घराचे छप्पर उडाले. यामुळे त्यांचे कुटुंब उघड्यावर आले. दरम्यान यात त्यांची चार वर्षाची मुलगी कल्याणी हिच्या डोळ्याजवळ वेळू लागल्याने ती जखमी झाली. तर मोटारसायकलचे नुकसान झाले. महसूल विभागाने तात्काळ सर्वे करून मदत द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्ताने केली आहे. राऊत यांनी राहते घर विटामातीचे बनले असून वेळू यांच्या मदतीने छत उभारले होते. हातावर आणून पानावर खाणाऱ्या किशोरचा निवारा वादळाच्या तडाख्यात उडाल्याने राहावे कुठे हा चिंतेचा विषय बनला आहे. साकोली : मेघ गर्जनेसह वादळी पावसाचे हजेरी लावली. यामुळे पानटपऱ्यांवरील प्लास्टीकचे छत कोसळले असून काही दुकानदारांचे नुकसान झाले आहे. तर उन्हाळी धानपिकाला फायदा झाला आहे. साकोली मंडळात १७.३ मि.मी., एकोडी मंडळात १२ मि.मी. तर सानगडी मंडळात १८.२ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली.रविवारला सकाळपासून ढगाळ वातावरण होते. सायंकाळी वादळाला सुरूवात झाली. रात्री १० वाजतानंतर अचानक मेघगर्जनेसह सुसाट्याचा वारा व पाऊसाला सुरूवात झाली. या पावसामुळे वातावरणात गारठा निर्माण झाला. वादळामुळे पानटपरी चालकांना नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. मात्र, या पावसाचा उन्हाळी धानपिकाला फायदा झाला. वादळी पावसामुळे परिसरातील काही गावात रात्री विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. तर कुंभली परिसरात कृषीपंपाची विद्युत पुरवठा काल रात्रभर व आज दिवसभर बंद आहे.लाखनी : तालुक्यात रात्री ९ वाजतापासून वादळी पावसाला सुरुवात झाली. रात्रभर पावसाची रिपरीप सुरु होती. तालुक्यात लाखनी १२.६ मि.मी., पिंपळगाव ६.२ मि.मी., पालांदूर ३४.६ मि.मी. पाऊस पडला. तालुक्यातील पिंपळगाव (सडक) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारतीचे छत कोसळले. ही इमारत शासनाकडे दुरूस्तीसाठी गेल्या सात वर्षापासून प्रस्तावित केली आहे. सरपंच श्याम शिवणकर, केंद्रप्रमुख सुजाता बागडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चेकराम बेदरकर, मुख्याध्यापिका इंदिरा पडोळे यांनी सदर नुकसानीची माहिती शिक्षण विभाग व तहसील प्रशासनाला दिली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
गारांसह वादळी पावसाने झोडपले
By admin | Published: March 29, 2016 12:23 AM