भंडारा : जीवनावश्यक वस्तूंमध्ये समावेश असलेल्या घरगुती गॅस सिलिंडरचे भाव वाढतच आहेत. मागील महिन्यात पन्नास रुपयांनी दरवाढ झाल्यानंतर आता पुन्हा त्यात २५ रुपयांनी वाढ झाली आहे. आता घरगुती प्रति सिलिंडरमागे ९२१ रुपये ग्राहकांना मोजावे लागणार आहेत. विशेषत: सबसिडीमध्ये मात्र काहीच वाढ झाल्याचे दिसून येत नाही. याचा सरळ सरळ फटका गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबीयांना बसणार आहे. एकीकडे सिलिंडरचे भाव वाढत असताना दुसरीकडे सातत्याने सबसिडी घटत आहे. जनसामान्यांचे महागाईमुळे कंबरडे मोडले असून, त्यात सिलिंडरच्या भाववाढीने अनेकांचे आर्थिक चक्र बिघडले आहे. गत वर्षभरात गॅस सिलिंडरचे भाव ४३६ रुपयांनी वाढले. तर सबसिडी मात्र कमी झाली आहे. उज्ज्वला योजनेअंतर्गत अनेकांना गॅस सिलिंडर मिळाले असले तरी आता सिलिंडरचे भाव वाढल्याने पुन्हा एकदा चूल पेटवायची काय, असा प्रश्नही गृहिणी उपस्थित करीत आहेत.
बॉक्स
सबसिडी बंद, दरवाढ सुरूच
जुलै २०२० मध्ये सिलिंडर ४६० रुपयांना मिळत होता. त्यानंतर सातत्याने गॅसच्या किमतीत वाढच होत गेली. जुलै २०२१ मध्ये गॅस सिलिंडर ८९४ रुपयांत उपलब्ध झाला होता. या महिन्यात २५ रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे आता ग्राहकांना ९२१ रुपये मोजावे लागणार आहेत.
बॉक्स
छोट्या सिलिंडरचे दर जैसे थे
जिल्ह्यात घरगुती व व्यावसायिक सिलिंडरच्या प्रमाणात छोट्या सिलिंडरलाही मागणी आहे. सद्य:स्थितीत पाच किलोचा छोटा सिलिंडर ३३९ रुपयांना मिळत आहे. घरगुती गॅसच्या किमतीत २५ रुपयांनी वाढ करण्यात आली. मात्र छोट्या सिलिंडरच्या दरात सध्यातरी कुठलीही वाढ झाल्याचे दिसून येत नाही. हा थोडासा दिलासा लहान सिलिंडर वापरकर्त्यांना मिळाला आहे.
बॉक्स
व्यावसायिक सिलिंडर तीन रुपयांनी स्वस्त
एकीकडे गॅस कंपन्यांनी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरामध्ये प्रत्येक सिलिंडरमागे २५ रुपयांची वाढ केली तर व्यावसायिक सिलिंडरमध्ये तीन रुपये कमी केले आहेत.
कोट बॉक्स
शहरात चुली कशा पेटवायच्या?
आधी घरात सिलिंडर असणे म्हणजे स्टेटस सिम्बॉल समजले जायचे. मात्र वाढत्या महागाईने डोळ्यांत अश्रू आणले आहेत. त्यातच सिलिंडरचे भावही चांगलेच वाढल्याने काय करावे आणि काय नाही, अशी स्थिती झाली आहे. दुसरीकडे चूलही पेटविता येत नाही.
- रोशनी सातपुते, गृहिणी, भंडारा
बॉक्स
शहरात चूल पेटविणे शक्य बाब नाही. धुरामुळे घरातील वृद्ध मंडळींना त्याचा त्रास होतो. दुसरी बाब म्हणजे चूल पेटवायची तर लाकूड किंवा वैरण आणायची कुठून, हीपण वेगळी समस्या आहे. सिलिंडरचे भाव सातत्याने वाढत असतील तर जगायचे कसे, असा प्रश्न आहे.
- माधुरी पुसाम, गृहिणी - भंडारा